एक ना धड भाराभर चिंध्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:02 AM2019-06-23T06:02:29+5:302019-06-23T06:02:46+5:30

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनाच्या पद्धतीत केलेल्या बदलामुळे शिक्षण क्षेत्रात नवीन धुराळा उडाला आहे.

Maharashtra Education Sector | एक ना धड भाराभर चिंध्या!

एक ना धड भाराभर चिंध्या!

googlenewsNext

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनाच्या पद्धतीत केलेल्या बदलामुळे शिक्षण क्षेत्रात नवीन धुराळा उडाला आहे. तळागाळातील मुलांना गणीत सोपे जावे, यासाठी तज्ज्ञांच्या समितीने पूर्ण विचारांती हा बदल केल्याचे स्पष्टीकरण बालभारतीने दिले आहे. तर मराठी भाषेचा विचार न करता, केवळ इंग्रजीच्या प्रभावाखाली येऊन केलेला हा ‘नसता खटाटोप’ असल्याचे बहुतांश वाचकांचे मत आहे. संख्यावाचनाची नवी पद्धती शिकलेली पिढी जेव्हा व्यवहारात येईल, तेव्हा गोंधळ आणखी वाढेल. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी ही अवस्था असल्याचे वाचकांना वाटते.

इंग्रजी भाषेची उचलेगिरी करून गणित शिकवू नये

- दिलीप वसंत सहस्रबुद्धे
सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी मुरारजी पेठ, सोलापूर.

संख्यावाचनाची सुचविलेली पद्धत अशास्त्रीय व मराठी भाषेच्या वैशिष्ट्याशी सुसंगत नाही, तसेच गणितही मराठी माध्यमातून शिकायचे व शिकवायचे आहे. यासाठी खालील मुद्दे व स्पष्टीकरण विचारात घेण्याची विनंती आहे.
संख्यावाचनाची शास्त्रीय पद्धत एक दशक एक म्हणा (११), दोन दशक एक म्हणा (२१), गणिती मराठी भाषेच्या शास्त्राप्रमाणे लिहा व वाचा. ११ या संख्येचे वाचन दहा एक करणे याला कोणता अर्थ आहे? किंवा एक एक या वाचनाला कोणता अर्थ आहे? अशास्त्रीय व अर्थहीन बाबी शिकविणे व त्याचे समर्थन करणे सर्वथा अयोग्य आहे. एक दहा ऐवजी दशक म्हणतात, ते का म्हणतात; हे पण समजून घेतले पाहिजे. इथे दहा नसून दहाचा एक गट धरला आहे व पुढे १०१ साठी एकचा अर्थ एक शतक धरला आहे, म्हणून एकशे एक वाचायचे आहे. थोडक्यात, दुसऱ्या भाषेची उचलेगिरी होऊ नये. गणितसुद्धा मराठीमधूनच शिकायचे आहे. ११ ते ९९ या संख्यांना मराठीत स्वतंत्र शब्द दिला आहे, हे मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे.
अकरा, बारा, तेरा. ..एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस. ..एकतीस..नव्याण्णव. इंग्रजीमध्ये पण एलेवन, नाइनटीन असे स्वतंत्र शब्द आहेत व पुढे टष्ट्वेंटी वन अशी रचना आहे. परंतु मराठीत ‘वीस एक’ याला काही अर्थ नाही. मराठीत विभक्ती प्रत्यय असतात, इंग्रजीमध्ये ते नाहीत. मराठी ही उच्चाराप्रमाणे तंतोतंत लिहिली जाणारी भाषा आहे. इंग्रजीमध्ये पोनेटिक्स वेगळे आहे. आपल्याला गणित मराठी भाषेतून शिकवायचे आहे, हे महत्त्वाचे तत्त्व विसरणे अयोग्य आहे. चौऱ्यांशी याला मराठी भाषेत अर्थ आहे. कारण ० ते ९ या अंकाचे उच्चार व १ ते १० या संख्येचे उच्चार भिन्न आहेत. तेव्हा इतर भाषेप्रमाणे गणित शिकविणे अयोग्य आहे. पुढे मोठ्या संख्या वाचताना अडचणी येतील. उदा. १५२ एकशे पन्नास दोन, १९८४ एकोणीशे ऐंशी चार असे वाचणार आहात का? मराठी भाषा बुडवायची असा चंग बांधला असेल, तर विरोध केलाच पाहिजे व हे अशास्त्रीय व अयोग्य संख्यावाचन रद्दच झाले पाहिजे.


बदलाबाबत टोकाची भूमिका घ्यायला नको!

- प्राचार्य कैलास साळुंके, अध्यक्ष, पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ.

दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात सर्वंकष विचाराअंती बदल केलेला आहे. हा बदल स्वागतार्ह असून, शिक्षकांनीही तो आनंदाने स्वीकारला आहे. लहान मुलांची आकलन क्षमता चांगली असते. ती सातत्याने विकसित होत असते. मात्र, शाळेमध्ये काही मुलांना अवघड शब्द उच्चारणे किंवा त्याचे आकलन होणे कठीण जाते. अनेक मुलांना पहिलीत आल्यानंतर संख्यावाचन इतर गोष्टींचे आकलन होते. तिथे त्यांना सोप्या पद्धतीने शिकविल्यास ते पटकन समजतात. दोन्ही क्षमतेच्या विद्यार्थ्यांचा या बदलामध्ये विचार केला आहे. २१ ते ९९ पर्यंतच्या संख्या दोन्ही पद्धतीने दिल्या आहे. वीस एक आणि एकवीस या दोन्ही पद्धतीमुळे विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार आकलन करतील. पुढे त्यांच्या क्षमता विकसित होत जातील. ज्यांना गणित विषयच समजला नाही, त्यांनी या बदलाचा खोलवर जाऊन विचार करायला हवा.
संख्यावाचनातील बदल हा पहिला टप्पा आहे. या बदलामुळे अंकगणितीय क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया पुढे सोप्या जातील. हा अत्यंत प्राथमिक स्तरावरील बदल आहे. पुढील काळात आणखी बदल अपेक्षित आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे. गणितामध्ये मुले मागे पडतात. त्यानंतर ही स्थिती सुधारण्यासाठी केलेले बदल स्वीकारायला हवेत. अनेकांना काही बदल म्हटले की वेगळे वाटायला लागते. कुठल्याही बदलाबाबत टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. अनेकांनी पुस्तक न वाचताच त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्याचे दिसते. त्यावर विनोद, बोचरी टीका सुरू आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. विद्यार्थी हा या प्रक्रियेतील मुख्य घटक आहे. या बदलाचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय, हा बदल ते कसा स्वीकारतात, त्यांचे आकलन वाढले आहे का, हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यानंतर या बदलांचा अभ्यास करून भूमिका घ्यावी. पण सध्यातरी हा बदल सकारात्मक घेणे गरजेचे आहे.

Web Title: Maharashtra Education Sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.