अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:54 IST2025-09-15T19:54:05+5:302025-09-15T19:54:34+5:30
अशोक चव्हाणांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्वाचे पदे काँग्रेस पक्षाने दिल्याची करून दिली आठवण

अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात दिवंगत शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पिता-पुत्रांस तब्बल ६० वर्षे स्थानिक ते राज्य व केंद्रीय सत्तेत स्थान मिळाले. पण गेल्या १४ वर्षात आपल्याला काँग्रेस पक्षात वनवास भोगावा लागला, असे मत भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी लातूरमध्ये बोलताना व्यक्त केले होते. या विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खोचक टोला लगावला. अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो, असे सपकाळ म्हणाले.
अशोक चव्हांनाना टोला
"अशोक चव्हाण यांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्वाचे पदे काँग्रेस पक्षाने दिली. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी महत्वाचे पदे मिळाली. यानंतरही अशोक चव्हाण यांचे मत आहे की त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षातील वास्तव्याचा काळ हा वनवास होता. तर मग असा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशी भावना पक्ष कार्यकर्त्यांची आहे," असा टोला सपकाळ यांनी लगावला.
नोकरभरतीवरून सरकारवर टीका
राज्यात २.५ लाख सरकारी जागा रिक्त जागा असतानाही सरकार मात्र नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
फडणवीस, माफी मागा!
बंगळूरु येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. यातून उच्चविद्याविभूषित देवेंद्र फडणविस यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले. वास्तविक पाहता शिवाजी नगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पण शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. खरे पाहता भाजपा परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. सावरकर यांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हेही फडणविसांनी वाचावे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लीम व अनुसूचित जाती बहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणिवपूर्वक खोटे बोलून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही सपकाळ म्हणाले.