Maharashtra Budget Session: फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? पेन ड्राईव्हचा उल्लेख करत गृहमंत्र्यांनी यादीच वाचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:09 IST2022-03-14T18:09:36+5:302022-03-14T18:09:55+5:30
Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं प्रत्युत्तर

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? पेन ड्राईव्हचा उल्लेख करत गृहमंत्र्यांनी यादीच वाचली
मुंबई: विरोधी पक्षनेते सध्या सातत्यानं पेन ड्राईव्ह आणत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सोपवला. त्यानंतर आज त्यांनी आणखी एक पेन ड्राईव्ह विधानसभेत आणला. फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का, असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत विचारला. राज्य सरकार विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यांच्या आरोपांना वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीसांनी स्टिंग ऑपरेशनचा दावा केला. १२५ तासांचं फुटेज असल्याचं ते म्हणतात. गरज पडल्यास ते आणखी काही पेन ड्राईव्ह आणतील की नाही ते मला माहीत नाही. पण याआधी फडणवीसांनी राज ठाकरेंना एक पेन ड्राईव्ह पाठवला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह आणला. आज दुसरा पेन ड्राईव्ह आणला. फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का, अशी विचारणा वळसे-पाटील यांनी केली.
गिरीश महाजनांचं नाव घेऊन फडणवीसांनी पोलीस, सरकारनं षडयंत्र रचल्याचा आरोप केला. पोलिसांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. पाच वर्ष मी गृहमंत्री होतो. मला पोलिसांचा अभिमान आहे म्हणता आणि प्रत्येक प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावी अशी मागणी करता. म्हणजे ज्या पोलिसांचा अभिमान असल्याचं सांगता, त्याच पोलिसांवर तुम्हाला विश्वास नाही का, असा सवाल गृहमंत्र्यांनी विचारला.
तुम्ही कोणाकोणाचे फोन टॅप केले?
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे कोणाकोणाचे फोन टॅप केले, त्याची यादीच वळसे पाटील यांनी वाचून दाखवली. २०१५ ते २०१९ या कालावधीत नाना पटोले, बच्चू कडू, संजय काकडे, आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले. यातले बरेच नेते तर त्यावेळी भाजपमध्ये होते. खोट्या नावांनी त्यांचे फोन टॅप झाले. विरोधकांचे फोन टॅप करणं कदाचित समजून घेता आलं असतं. पण स्वत:च्या नेत्यांचे फोन टॅप का केले नाही हे समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला.