अजितदादांच्या स्मृतींना समर्पित अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस यांचे मन आठवणींनी जड झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 07:09 IST2026-03-07T07:09:04+5:302026-03-07T07:09:48+5:30
अजितदादांच्या स्मृतींना हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले.

अजितदादांच्या स्मृतींना समर्पित अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस यांचे मन आठवणींनी जड झाले...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन दादांच्या आठवणीने जड झाल्याचे पाहायला मिळाले. अजितदादांच्या स्मृतींना हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले.
अजितदादांनी एकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नाते दृढ झालेले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच राज्याची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. ‘काम करणारा माणूस’ ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्मारक उभारणार
अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक उभारण्यात येईल तसेच त्यांच्या नावे ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्यात येईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
अर्थसंकल्पीय भाषणाला सुरवात होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.