Maharashtra Budget 2022 : विकासाची पंचसूत्री हाती घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:38 IST2022-03-11T17:37:54+5:302022-03-11T17:38:32+5:30
Dhananjay Munde : बार्टीला 250 कोटी रुपये निधी तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंद करण्याच्या दृष्टीने सफाई कामगारांना गटार सफाई करण्यासाठी आधुनिक मशिन्स देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Maharashtra Budget 2022 : विकासाची पंचसूत्री हाती घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे
मुंबई : कोविड काळातील दोन वर्षांच्या संघर्षानंतर राज्य सरकारची आर्थिक स्थिती आता पूर्वपदावर येत असल्याने कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या 5 विभागांच्या विकासाची पंचसूत्री केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान, शेततळ्यासाठी 50 टक्के वाढीव अनुदान, 104 नव्या सिंचन प्रकल्पांना मान्यता, मराठवाडा व विदर्भातील शेतीच्या शाश्वत विकासाला आर्थिक चालना, शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून बळीराजाला समृद्धी देण्याचा या अर्थसंकल्पातून प्रयत्न राज्य सरकारने केला आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 1 हजार 800 कोटींची वाढ देत 15 हजार 106 कोटी रुपये निधी देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याचबरोबर बार्टीला 250 कोटी रुपये निधी तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंद करण्याच्या दृष्टीने सफाई कामगारांना गटार सफाई करण्यासाठी आधुनिक मशिन्स देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
याचबरोबर, छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू-तुळापूर येथील स्मृतिस्थळी विकास करण्यासाठी 250 कोटी रुपये देण्यात येणार असून, कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ व परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी देखील दिला जाणार आहे. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या पहिल्या शाळेसह राजर्षी शाहू महाराज, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या मूळ जन्मगावी असलेल्या शाळांच्या विकास व संवर्धनासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
राज्यात तरुणांना रोजगार निर्मितीसाठी अर्थसहाय्य, उद्योगांना चालना व गुंतवणूक आदी क्षेत्रातही मोठ्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. कायम उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र, रेशन कार्ड देणे तसेच त्यांच्यासाठी बीज भांडवल योजनेतून व्यवसाय कर्ज देणे यासाठीही निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली. सन 2022-23 चा हा अर्थसंकल्प समाजातील विविध स्तरातील घटकांच्या उन्नतीसाठी पूरक ठरणारा असून, राज्याला प्रगतीपथावर नेणारा असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
नगर बीड परळी रेल्वे मार्गास केंद्राच्या समप्रमाणात निधी मिळणार
बीड जिल्हा वासीयांसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या नगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी ठरलेल्या सूत्राप्रमाणे केंद्र सरकारच्या समप्रमाणात निधी देण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी केली. तसेच, बीड जिल्ह्यात एक स्त्री रुगणालय बांधकाम व श्रेणीवर्धन करण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पीय भाषणात अजितदादा पवार म्हणाले.