Maharashtra Budget 2022: ‘स्वराज्या’साठी अजित पवारांची मोठी घोषणा; छ. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:05 IST2022-03-11T16:05:16+5:302022-03-11T16:05:51+5:30
विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचं पाऊल आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

Maharashtra Budget 2022: ‘स्वराज्या’साठी अजित पवारांची मोठी घोषणा; छ. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी अन्...
मुंबई – राज्याचा आगामी २०२२-२३ या वर्षीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला. यापूर्वी विधानभवनात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर सभागृहात अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात करताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी शासनाकडून २५० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षात छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार देण्यात येतील असंही सांगितले आहे.(Maharashtra Budget Speech Updates)
अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वढु बुद्रुक इथं उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार २५० कोटींचा निधी उपलब्ध करून देईल. आगामी काळात असामान्य शौर्य, धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी येत्या वर्षापासून महाराजांच्या नावानं छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं विविध निधी उपलब्ध केला आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि परिसर विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राजगड, तोरणा, शिवनेरी, विजयदुर्ग किल्ल्यासाठी १४ कोटी तर मुंबईतील शिवडी आणि सेंट जॉर्जच्या विकासासाठी ७ कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा, युद्धनीती यासाठी यूनेस्कोकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई
दिला शब्द राज्याला की, धैर्याने जिंकू लढाई
लढाई लढताना विजयाची जागवली आशा
देशाने पाहिले अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा
अशा शायरीच्या अंदाजात अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाची दिशा मांडली. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला. विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचं पाऊल आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प जनतेसाठी विकास करणारा आणि त्याला आधार देणारा आहे. जनता सुद्धा या अर्थसंकल्पाचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.