Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 10:05 IST2025-12-04T10:04:01+5:302025-12-04T10:05:29+5:30
Rapido and Uber: रॅपिडो, उबेरसारख्या ॲप-आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश...नेमकं कारण काय?

Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
शासकीय नियमांना पायदळी तुडवत बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो, उबेरसारख्या ॲप-आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले. अलीकडेच शासनाने ई-बाईक धोरण जाहीर केल्यानंतर अनेक ॲप-आधारित कंपन्यांनी बाईक टॅक्सी सेवा सुरू केली. मात्र, चालकांना कोणतेही प्रशिक्षण न देता, खासगी बाईकद्वारे प्रवासी वाहतूक केली जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशाच एका अवैध बाईक टॅक्सीवरून प्रवास करताना अलीकडे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
मंत्री सरनाईक यांनी या तक्रारींची दखल घेत स्पष्ट निर्देश दिले की, बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत. त्यांनी सांगितले की, “देशातील इतर राज्यांत जसे नियम मोडून बेकायदेशीर व्यवसाय चालतो, तसे महाराष्ट्रात चालणार नाही. प्रवासी सुरक्षितता आणि चालकांचे हित यांना प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांना शासनाचा पाठिंबा राहील. मात्र, नियम पायदळी तुडवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” तसेच सरनाईक यांनी स्पष्ट केले की, गुन्हे चालकांवर नव्हे तर त्या कंपनीच्या मालकांवर दाखल केले जातील, कारण त्या कंपन्याच बेकायदेशीर सेवा सुरू करण्यास जबाबदार आहेत.
दरम्यान, २ डिसेंबर रोजी मुंबईतील घाटकोपर पोलिस ठाण्यात रॅपिडो या कंपनीविरोधात मोटार परिवहन विभागाने गुन्हा दाखल केला. कंपनीवर मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ६६(१) आणि १९२ चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तपासात उघड झाले की, ‘राइड शेअरिंग’च्या नावाखाली खासगी बाइक्स वापरून प्रवाशांची वाहतूक केली जात होती. मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा व्यावसायिक वाहतुकीसाठी वापर करण्यास स्पष्ट मनाई आहे.
रॅपीडो कंपनीने कलम ६६(१) चे उल्लंघन करत खासगी दुचाकींना व्यावसायिक टॅक्सीप्रमाणे चालवले. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक रवींद्रनाथ देशमुख यांनी तक्रार दाखल केली. कंपनीविरोधात कलम ६६, १९२ आणि ११२ (वेगमर्यादा उल्लंघन) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात मोटार वाहन विभागाने तपासणी मोहीम राबवली. त्यात कंपनीच्या ॲपद्वारे बुकिंग केलेले अनेक बाईक टॅक्सी चालक रंगेहाथ पकडले. चालक विनोद पाटील आणि प्रवासी अप्पाराव पिडपारे यांच्यासह अनेकांनी बाईक टॅक्सी सेवेचा वापर केल्याचे निदर्शनास आले. काही चालकांनी वेगमर्यादा मोडल्याचेही आढळले. ही कारवाई ही केवळ सुरुवात असून, बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर पुढील काळातही कठोर मोहिम राबवली जाईल, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.