'आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांना बदडून काढले, त्यांना सरकार रोजगार देणार का?', विजय वडेट्टीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:28 IST2025-12-14T13:27:16+5:302025-12-14T13:28:32+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था, असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.

'आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांना बदडून काढले, त्यांना सरकार रोजगार देणार का?', विजय वडेट्टीवार यांचा सवाल
नागपूर – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था, असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.
विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली. यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं असा आक्रमक पवित्रा वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतला.
यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ, आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत, असे आश्वासन सभागृहात दिले.