‘सोयाबीन, धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्या’, विजय वडेट्टीवार यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:21 IST2025-12-13T18:20:13+5:302025-12-13T18:21:15+5:30

Maharashtra Assembly Winter Session 2025: राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Maharashtra Assembly Winter Session 2025: ‘Give relief to farmers by giving bonuses to soybeans and paddy’, demands Vijay Wadettiwar | ‘सोयाबीन, धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्या’, विजय वडेट्टीवार यांची मागणी

‘सोयाबीन, धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्या’, विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर  – राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहे. अतिवृष्टीने राज्यातील २८ जिल्ह्यांना फटका बसला. सरकारने  ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.पण हे पॅकेज कागदावर राहिलें. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १८,५०० रुपये मदतीचे गाजर दाखवले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फक्त ८,५०० रुपये मिळाले. कृषी विभागाला ६,००० कोटी रुपयांची गरज असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ ६१६ कोटी रुपये दिले. चार महिन्यांपूर्वी 'कृषी समृद्धी' योजनेची मोठी घोषणा केली, पण आजपर्यंत या योजनेसाठी एका पैशाची तरतूद केलेली नाही. यामुळे विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही.

आर्थिक वर्ष संपायला अडीच महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ३४ टक्के निधी खर्च झाला आहे. आज शेतकऱ्यांचे पिक गेले, त्यांच्या जमिनी खरवडल्या दुसऱ्या बाजूला बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या आहेत. सोयाबीन,कापूस,धान शेतकऱ्यांच्या  शेतमालाला हमीभाव मिळत नाही. काळ्या मातीशी ईमान ठेवणाऱ्या या बळीराजाची फसवणूक महायुती सरकारने केली आहे. शेतकरी आत्महत्येचे पाप या सरकारचे आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था बिघडली आहे.राज्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारातही राज्याचा क्रमांक पहिला आहे, तर बाल गुन्हेगारीमध्ये राज्य पाचव्या क्रमांकावर आला आहे.राज्यात दररोज ८ बलात्काराच्या घटना आणि ५१ अपहरणाच्या घटना घडत आहेत. तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणे, हे समाजाला कलंक लावणारे आहे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण नाही. मुंबईत गेल्या ३६ दिवसांत ८२ मुले बेपत्ता झाली, ज्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे. जून ते डिसेंबर या काळात ३७० अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून त्यापैकी २६८ मुली आहेत. राज्यात पोलिस दलात ३३ हजार २२८ पदे रिक्त आहेत. प्रति एक लाख लोकांमागे केवळ १७२ पोलिस आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असून त्यांना शासकीय निवासस्थानांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

तसेच पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये 'एमडी' ड्रग्सचा विळखा वाढत असून तरुण पिढी बरबाद होत आहे. वाशिम, मालेगाव येथे गुटखा रॅकेट सुरू आहे. मुलींच्या विक्रीचे रॅकेट पालघर, मोखाडा, वाडा भागात सक्रिय असून या मुलींची ४० ते ५० हजार रुपयांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, पुणे येथील आदिवासी वसतिगृहात सुट्टीवरून परत आलेल्या मुलींची गर्भधारणा चाचणी केली जात असल्याच्या घटना अत्यंत निषेधार्ह आहेत. या प्रकरणाची SIT चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. 

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील मुंढवा येथील महार वतनाची जमीन आयटी पार्कसाठी आरक्षित नसतानाही, एका कंपनीला कवडीमोल भावाने देण्यात आल्याचा आरोप केला. २००० कोटींची जमीन ३०० कोटी मध्ये विकण्यात आली त्यावरचा ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क देखील माफ करण्यात आले. ज्या अमेडिया कंपनीने जमीन खरेदी केली त्यातील ९९ टक्के मालकी असलेल्यावर कारवाई का होत नाही?  राज्यातील अशा महसूल,गायरान, गावठाण,देवस्थान, शासकीय, वतनाच्या जमिनीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपुरात अधिवेशन होत असताना विदर्भातील सिंचनाचा बॅकलॉग तातडीने भरून काढावा.धानाला प्रति क्विंटल १००० रुपये आणि सोयाबीनला प्रति क्विंटल २००० रुपये बोनस द्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच उद्योगांना सबसिडी देऊन मिहान मध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन द्यावे. विदर्भातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी द्यावा. विदर्भ वैधानिक मंडळाला त्वरित मान्यता द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी अंतिम आठवड्याच्या भाषणात केली.

Web Title : सोयाबीन, धान किसानों को बोनस दें: विजय वडेट्टीवार की मांग।

Web Summary : विजय वडेट्टीवार ने महाराष्ट्र में किसान आत्महत्याओं और कृषि संकट के बीच सोयाबीन और धान किसानों के लिए बोनस की मांग की। उन्होंने सरकार के अपर्याप्त समर्थन की आलोचना की और त्रुटिपूर्ण धन आवंटन, बढ़ते अपराध और महिलाओं के खिलाफ अत्याचार जैसे मुद्दों पर प्रकाश डाला।

Web Title : Give bonus to soybean, paddy farmers: Vijay Wadettiwar's demand.

Web Summary : Vijay Wadettiwar demands bonus for soybean and paddy farmers amid farmer suicides and agrarian distress in Maharashtra. He criticized the government's inadequate support and highlighted issues like flawed fund allocation, rising crime, and atrocities against women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.