Maharashtra Assembly Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या; लाडक्या बहिणींसाठी किती कोटींची तरतूद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:25 IST2024-12-16T18:22:18+5:302024-12-16T18:25:07+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या; लाडक्या बहिणींसाठी किती कोटींची तरतूद?
Maharashtra Assembly Winter Session 2024 : नागपूर : नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आज 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झाले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. याशिवाय, मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.तर या पुतळ्याचे कंत्राट सुप्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. एकूण पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच 7 हजार 490.24 कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यापैकी 3 हजार 195 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला बिनव्याजी देण्यात आले आहेत.
हा निधी इमारती, रस्ते आणि पूल बांधण्यासाठी होणार आहे.पुरवणी मागण्यांपैकी 3 हजार 50 कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अतंर्गत वापरण्यात येणार आहे. तर साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी 1204 कोटी तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना 758 कोटी रुपये कर्ज देण्यासाठी वापरले जाणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या
पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.