"शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीला २१०० रुपये, सरकारी नोकर भरती तातडीने सुरू करा’’, नाना पटोलेंची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:46 IST2024-12-15T18:45:18+5:302024-12-15T18:46:58+5:30

Maharashtra Assembly Winter Session 2024: अधिवेशनात सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारला जाईल सरकारने मात्र पळ काढू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2024: "Loan waiver for farmers, Rs 2100 for beloved sister, start government job recruitment immediately", demands Nana Patole | "शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीला २१०० रुपये, सरकारी नोकर भरती तातडीने सुरू करा’’, नाना पटोलेंची मागणी  

"शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीला २१०० रुपये, सरकारी नोकर भरती तातडीने सुरू करा’’, नाना पटोलेंची मागणी  

नागपूर - नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरू नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारला जाईल सरकारने मात्र पळ काढू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आता सरकारने सरसकट ३ लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करावी. सोयाबीनला ७ हजार रुपये, कापसाला ९ हजार रुपये भाव द्यावा. हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी झाली असल्यास भावातील फरक देण्याचे सरकारने जाहीर केले होते तो आता सरकारने द्यावा. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्य़ाचे आश्वासन दिले होते आता ते तातडीने पूर्ण करावे. लाडकी बहिण योजनेतील ५० ते ६० टक्के लाभार्थी कमी करणार असल्याची चर्चा सुरू आहे परंतु निवडणुकीआधी ज्या बहिणांना १५०० रुपये दिले त्या सर्व बहिणांना कोणतेही नियम, अटी, शर्ती न लावता पैसे द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

राज्यातील विविध विभागात दोन लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, ही पदे भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. कंत्राटी पद्धतीने भरती करणार नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. सरकार आजही कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहे. कोणत्याही प्रकारे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करु नये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करावी असे नाना पटोले म्हणाले.

परभणी व बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. परभणीत संविधानाची विटंबना करण्यात आल्यानंतर झालेल्या घटनेत पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. बीडमध्ये एका सरपंचाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणी वाल्मिकी कराड या व्यक्तीचे नाव चर्चेत आहे, त्याचा मुख्यमंत्री फडणवीसांबरोबर फोटोही आहे, तो भाजपाचा कार्यकर्ता आहे का हे स्पष्ट करावे. बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात ३२ हत्या झालेल्या आहेत. या सर्व हत्यांची चौकशी उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तीमार्फत केली जावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यात बनावट औषधे विकून लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी आरक्षणावरून भाजपा युतीने राज्यात रान उठवले होते. आता ते पाशवी बहुमताने सत्तेत आले आहेत, सरकारने या आरक्षणप्रश्नावर भूमिका जाहीर करावी असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Maharashtra Assembly Winter Session 2024: "Loan waiver for farmers, Rs 2100 for beloved sister, start government job recruitment immediately", demands Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.