Maharashtra Assembly Speaker Election: 'मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर देणार?' आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 15:21 IST2022-07-03T15:18:05+5:302022-07-03T15:21:36+5:30
Maharashtra Assembly Speaker Election: ''सध्या या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्था दिली आहे. पण हे आणखी किती दिवस चालणार?''

Maharashtra Assembly Speaker Election: 'मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर देणार?' आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबेल केला. सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''आज बंड केलेल्या आमदारांकडे मी बघितले. त्यांची माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत झाली नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
"राहुल नार्वेकर कोणत्याही पक्षात गेले तर…" , सभागृहात अजित पवारांचा टोला
रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. आज नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, ''बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इथेच त्यांची अशी अवस्था झाली आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार?,'' असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
'नैतिक परीक्षेत अपयशी'
ते पुढे म्हणाले की, ''बंड केलेल्या आमदारांची आज नैतिक परीक्षा झाली. ते सर्वजण इकडे तिकडे बघत होते. मतदार संघात गेल्यावर शिवसैनिकांना ते काय सांगणार आहे. त्यांच्यासमोर कसे जाणार. सध्या या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत,'' असेही आदित्य ठाकरे म्हणाले.