राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:45 IST2025-07-04T13:44:13+5:302025-07-04T13:45:06+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : अध्यक्षपदाची गरिमा राखली पाहिजे; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचे रोखठोक मत

राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला.
"प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू ठेवले होते. पण काही सदस्य उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली, असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्ष पदाची एक गरिमा आहे. असे असताना तिथून राजकीय भाष्य होणे योग्य नाही, ३० वर्ष या सभागृहात काम करताना असा प्रकार घडलेला नाही" अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
"तालिका सभाध्यक्ष मर्यादित काळापुरते बसले असले, तरी त्यांना अध्यक्ष मानून मान दिला जातो. पण विरोधी पक्षातील काही सदस्य उपस्थित नाही म्हणून राजकीय टिपण्णी केली जाते. सभागृहाचे कामकाज नीट व्हावे ही जबाबदारी सरकारची असते. ज्या विभागाचा प्रस्ताव असतो, त्या विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित आहेत की नाही हे पाहणे संसदीय कामकाज मंत्र्यांचे असते. अशा वेळी सभागृहात सर्वोच्च स्थानावरून सभागृहाची प्रथा परंपरा किंवा संकेत पाळले गेले पाहिजेत. राजकीय भाष्य करणाऱ्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा", अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत, त्या चौकटीत राहून पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही, असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले.