महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 23:55 IST2024-09-20T23:54:43+5:302024-09-20T23:55:44+5:30
या बैठकीला उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोराट, तर शरदपवार गटाकडून जयंत पाटिल आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास अघाडीची (MVA) एक महत्वाची बैठक वांद्रे येथील सोफिटेल हॉटेलमध्ये पार पडली. जवळपास 4 तास चाललेल्या या बैठकीत मुंबई-कोंकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यात तीनही घटक पक्षांची 120 ते 130 जागांवर सहमती झाली असल्याचे समजते.
या बैठकीला उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोराट, तर शरदपवार गटाकडून जयंत पाटिल आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. महाविकास अघाडीतील नेत्यांनी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भातील पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण केली आहे.
सूत्रांच्या हवाल्याने आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 120 ते 130 जागांवर सहमती झाली आहे. याच बरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जो पक्ष ज्या जागेवर निवडून आला, तो पुन्हा त्याच जागेवरून निवडणूक लढवेल. मात्र, पूर्वी जिंकलेल्या साधारणपणे 10 ते 20 टक्के जागांची अदला-बदली होण्याची शक्यता आहे.
एकमत नसलेल्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीचा प्लॅन -
महत्वाचे म्हणजे, एकमत नसलेल्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट, या तीनही घटक पक्षांच्या सहमतीने एक एजन्सी नेमली जाईल. ही समिती, संबंधित जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार सर्वात प्रबळ आहे, याचा शोध घेईल. याशिवाय पुढील बैठकीत विदर्भातील 62 जागांवर चर्चा होईल आणि लवकरच अंतिम जागावाटपाची चर्चा होईल.