Vidhan Sabha 2019: अखेर एमआयएमला-'वंचित'चा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 15:06 IST2019-10-09T14:55:14+5:302019-10-09T15:06:14+5:30
सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तोडल्याचा खुलासा एमआयएमकडून करण्यात आला होता.

Vidhan Sabha 2019: अखेर एमआयएमला-'वंचित'चा पाठिंबा
मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या शेवटच्या क्षणाला युती तोडणारे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पुन्हा एकत्र आले आहे. या दोन्ही पक्षाने जरी युती तोडली असली, तरीही औरंगाबादच्या पूर्व मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार गफ्फार कादरी यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कादरी यांना मतदान करण्याचे आवाहन सुद्धा आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तोडल्याचा खुलासा एमआयएमकडून करण्यात आला होता. त्यांनतर या दोन्ही पक्षाने आप-आपले उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे दोन्ही पक्षातील उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र अनेक मतदारसंघात पहायला मिळत आहे. मात्र औरंगाबाद पूर्व मतदारसंघात वंचितकडून उमेदवार देण्यात आला नसल्याने त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे असे पत्रकच आंबेडकर यांनी काढले आहे.
लोकसभा निवडणुकीत एकत्र लढणारे वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यातील विधानसभेला युती तुटल्यानंतर सुद्धा, पुन्हा एकत्र येऊ शकतात असे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात आले होते. असे असताना सुद्धा दोन्ही पक्षांत शेवटपर्यंत युती होऊ शकली नाही. त्यामुळे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी व प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवले. मात्र औरंगाबाद मध्य मतदारसंघात वंचितकडे उमेदवार नसल्याने त्यांनी कादरी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेत 'न झालेली युती' या निमत्ताने दिसून आल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.