महागड्या एचएसआरपी नंबर प्लेटबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले, महाराष्ट्रात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:44 IST2025-03-07T14:43:05+5:302025-03-07T14:44:30+5:30
CM Devendra Fadnavis on HSRP Price: सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एचएसआरपी नंबरप्लेटच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एचएसआरपी नंबर प्लेटच्या दरांबाबतची आकडेवारी सभागृहात मांडली. तसेच महाराष्ट्रामध्ये एचएसआरपी नंबर प्लेटचे दर वाजवी असल्याचे सांगितले.

महागड्या एचएसआरपी नंबर प्लेटबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले, महाराष्ट्रात...
सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एचएसआरपी नंबरप्लेटच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना एचएसआरपी नंबर प्लेटच्या दरांबाबतची आकडेवारी सभागृहात मांडली. तसेच महाराष्ट्रामध्ये एचएसआरपी नंबर प्लेटचे दर वाजवी असल्याचे सांगितले.
देशात सर्वात महाग एचएसआरपी नंबरप्लेट महाराष्ट्रात विकल्या जात आहेत, असा एचएसआरपी नंबरप्लेटबाबत एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. खरंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याची अंमलबजावणी आपल्याला आधीच करायची होती. दरम्यान, या एचएसआरपी नंबरप्लेटच्या अंमलबजावणीबाबत आपण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्यांनी इतर सदस्यांसोबत मिळून या नंबर प्लेटबाबत जे काही दर आले होते. त्याचं मूल्यमापन करून अंतिम दर निश्चित केले आहेत.
यासंदर्भात आपण पाहिलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेसहे वेगवेगळे दाखवले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण हे सर्व एकत्र केलं आहे. विविध राज्यांतील दुचाकींसाठीच्या एचएसआरपी नंबर प्लेटचे दर पाहिते तर ते ४२० ते ४८० दरम्यान आहेत. महाराष्ट्रामध्ये हे दर ४५० रुपये आहेत. तर तीन चाकींसाठी सर्व राज्यांमध्ये ४५० ते ५५० रुपये दर आहे, तर महाराष्ट्रामध्ये हेच दर ५०० रुपये आहेत. चारचाकींसाठी सरासरी ८०० रुपये दर आहे. तर महाराष्ट्रामध्ये ते ७५० रुपये आहेत. जड वाहनांसाठी ६९० ते ८०० तर आपल्याकडे हा दर ७४५ रुपये आहे. पुरावा म्हणून मी मुद्दाम इतर राज्यांमधील पावत्या घेऊन आलो आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी एचएसआरपी नंबर प्लेटबाबत करण्यात येत असलेले दावे फेटाळून लावले आहेत.
देवेंद्र फडवणीस पुढे म्हणाले की, आता आपण एचएसआरपी नंबर प्लेटबाबत आपण गोव्याचा विचार केला तर त्यांनी मूळ किंमत ३१५ रुपये, फिटमेंट किंमत १०० रुपये, कन्व्हेयन्स फी ५० रुपये, जीएसटी ८३ रुपये, असं केलं तर त्यांची किंमत ५४८ रुपये एवढी होते. चंडीगडचीही जवळपास ५४९ रुपये एवढी किंमत होते. तर महाराष्ट्राची एकूण किंमत पाहिली तर ती ५३१ रुपये एवढी होते. त्यामुळे महाराष्ट्रात एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अवाजवी किंमत आकारली जात आहे, असं नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीनिशी सभागृहाच्या निदर्शनास आणले.