Maharashtra Lockdown: रात्रीची संचारबंदी, वीकएण्डला लॉकडाऊन; कोरोनाला रोखण्यासाठी आता ‘ब्रेक द चेन’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:49+5:302021-04-05T06:50:43+5:30

Maharashtra Lockdown: कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारचे ‘ब्रेक दी चेन’ अभियान, ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात अंमलबजावणी

Maharashtra Announces Night Curfew, Weekend Lockdown Amid Covid Spike | Maharashtra Lockdown: रात्रीची संचारबंदी, वीकएण्डला लॉकडाऊन; कोरोनाला रोखण्यासाठी आता ‘ब्रेक द चेन’

Maharashtra Lockdown: रात्रीची संचारबंदी, वीकएण्डला लॉकडाऊन; कोरोनाला रोखण्यासाठी आता ‘ब्रेक द चेन’

Next

मुंबई : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी’ असे धोरण अवलंबत कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. सोमवार (५ एप्रिल) रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

यापुढे ‘मिशन बिगीन अगेन’ ऐवजी ‘ब्रेक दी चेन’ या नावाने ही नवी नियमावली लागू होईल. राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकांनी आरोग्याचे नियम न पाळता गर्दी केल्यास स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते. 

चित्रीकरणांवर निर्बंध 
चित्रीकरण सुरू ठेवता येईल, मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये. तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल. 
आजारी कामगाराला काढता येणार नाही
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे.  केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल. कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे. 
तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट
५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार, बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

हे सुरू राहणार 
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे ‘वर्क फ्रॉम होम’ करणे बंधनकारक. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये सुरू राहतील. 
शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू राहणार. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाइनद्वारे घ्याव्यात. 
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे.  
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. 
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस १००० रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू राहील. मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तूंची दुकाने. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे. तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे. 
सार्वजनिक व खासगी 
अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. 
रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
 वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू ठेवण्यात येईल. मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.  
 बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी  असू नयेत. तसेच प्रवाशांनी मास्क घातलेले असावे. 

हे बंद राहणार 
अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद.
मनोरंजन व करमणुकीची स्थळे, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले,  सभागृहे, वॉटर पार्क्स, सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा. 
 सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी  बंद राहतील. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजाअर्चा करता येईल. 
 उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागतासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. 
 शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र दहावी व बारावी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील. 
९३,२४९ देशात कोरोनाबाधित
देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ९३ हजार २४९ वर पोहोचला. तर महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात ५७ हजार रूग्णांची नाेंद झाली. 

गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी एका दिवसात ९३ हजार ३३७ बाधितांची नोंद झाली होती. 
बाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा सलग २५ वा दिवस असून मृतांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे. 
रुग्णवाढीच्या बाबतीत भारताने अमेरिका आणि ब्राझील यांनाही मागे टाकले आहे.

अक्षयकुमार, गोविंदा कोरोनाबाधित
रणबीर कपूर, आलिया भट, आमीर खान यांच्यापाठोपाठ आता अभिनेता अक्षयकुमार आणि गोविंदा यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अक्षयने रविवारी सकाळी ट्विट करून ही माहिती दिली. तर सुनीता आहुजा यांनी पती व अभिनेता गोविंदा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.

पंतप्रधानांना चिंता   
 देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. 
 देशातील बाधितांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त करतानाच नियमांची कठोर अंमलबजावणी राज्ये करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 
 महाराष्ट्रासह पंजाब, आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठविण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले. 
 केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लवकरच नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता.    

महाराष्ट्रात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची बातमी 'लोकमत डॉट कॉम'वर रविवारी संध्याकाळी ५.२७ वाजता 'ब्रेक' करण्यात आली. त्यासोबत लोकमतच्या फेसबुक पेजवर (www.facebook.com/lokmat) व ट्विटर हँडलवरही (@MiLOKMAT) 
ती तत्काळ प्रकाशित करण्यात आली.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात शनिवारी एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली. याची दखल घेऊन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.  महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचे लसीकरण केले आहे. 
 

Web Title: Maharashtra Announces Night Curfew, Weekend Lockdown Amid Covid Spike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.