Rajya Sabha Election : नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाला मुकावं लागणार; जयंत पाटील म्हणाले, “निराशा झाली…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:53 IST2022-06-09T16:52:50+5:302022-06-09T16:53:29+5:30
विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका दिला आहे.

Rajya Sabha Election : नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाला मुकावं लागणार; जयंत पाटील म्हणाले, “निराशा झाली…”
विशेष पीएमएलए न्यायालयाने (Special PMLA Court) महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा दणका दिला आहे. ऱ्राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने करण्यात आला. परंतु न्यायालयानं हा अर्ज नाकारल्यानं मतदानात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार नाही. दरम्यान, यावर जलसंपदा मंत्री जयंत राटील यांनी न्यायालयाच्या या निर्णयामुळे निराशा झाल्याचं म्हटलं.
“राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा झाली आहे,” अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या तसेच अजून कोणताही गुन्हा सिद्ध न झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा अशी आमची मागणी होती. मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली आणि त्यांच्या हक्काचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही. यासंदर्भात पुढील पावले टाकण्याबाबत नवाब मलिक व अनिल देशमुख यांचे वकील भूमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.