रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या राष्ट्रीय चर्चेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव प्रमुख पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 22:06 IST2024-09-30T22:05:34+5:302024-09-30T22:06:05+5:30
भोपाळ - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चेमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे प्रमुख ...

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या राष्ट्रीय चर्चेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव प्रमुख पाहुणे
भोपाळ - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चेमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय चर्चेमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि त्यांचं जनकल्याणकारी सुशासन हा मुख्य विषय असेल. या दौऱ्यादरम्यान, मोहन यादव हे पुण्यामधील शिवसृष्टीचीही पाहणी करणार आहेत.
जानकी देवी बजाज इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऑडिटोरियममध्ये होणाऱ्या या राष्ट्रीय चर्चेचं अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवणार आहेत. या चर्चासत्रामध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे हेही उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रामध्ये संध्याकाळी व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये निवेदिताताई भिडे (उपाध्यक्षा, स्वामी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी) ह्या मुख्य वक्त्या असतील. व्याख्यानमालेचं अध्यक्षपद डॉ. देविदास पोटे भूषवतील. तर समारोपसत्राला एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव संबोधित करतील.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे पुण्यातील आंबेगाव येथे असलेल्या शिवसृष्टीचीही पाहणी करणार आहेत. ही शिवसृष्टी २१ एकर परिसरात पसरलेली आहे. तसेच तिच्या निर्मितीसाठी अंदाजे ४३८ कोटी ६८ लाख रुपये खर्च झाला आहे. महाराजा शिव-छत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टकडून संचालित शिवसृष्टी थीम पार्कच्या निर्मितीचा उद्देश हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट आणि संघर्ष जिवंत करणं हा आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत.