ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 22:37 IST2025-09-07T22:34:38+5:302025-09-07T22:37:22+5:30
Chandra Grahan Started: यंदाचे खग्रास चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असल्याने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०९ वाजून ५७ मिनिटांपासून खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असले तरी ढगाळ वातावरणामुळे अनेक भागांत दिसणार नाही. ऐन पौर्णिमेलाच पूर्ण चंद्र दिसण्याऐवजी चंद्र झाकोळला जात आहे.
चंद्रग्रहणाचे संपूर्ण नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचे खग्रास चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असल्याने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण लागते, असे म्हटले जाते. परंतु, भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असणार आहे. त्यामुळे देश-दुनियेवर अशुभाची छाया, प्रतिकूल प्रभाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.
सूर्य-चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात. म्हणजेच सूर्य अमावास्येला अगर चंद्र पौर्णिमेला राहुच्या किंवा केतुच्या जवळच असावा लागतो. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. भाद्रपद पौर्णिमेला चंद्र ग्रह कुंभ राशीत आहे. याच राशीत राहु आहे. तर समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य, केतु आणि बुध आहेत. बुधादित्य राजयोगात २०२५ मधील खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो, तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते.