नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:56 IST2025-08-14T13:56:30+5:302025-08-14T13:56:56+5:30
भूकंपाचा तीव्र धक्का की मोठा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली. परंतु पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर आले

नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दुपारी अचानक आलेल्या जोरदार आवाजाने स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. जवळपास २५ किमी परिसरात हा आवाज ऐकू आला. हा हादरा इतका भयंकर होता की काही घरांच्या काचाही फुटल्याचे समोर आले. हा गूढ आवाज नेमका कशाचा होता हाच लोकांना प्रश्न पडला. आवाजाच्या पार्श्वभूमीवर तलाठी आणि तहसीलदारांनी या प्रकाराचा शोध सुरू केला. त्यातच पोलिसांनी आवाजाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
भूकंपाचा तीव्र धक्का की मोठा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली. परंतु पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर आले. हा आवाज नाशिकच्या ओझर इथल्या लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा होता. हिंदुस्थान अरोनॉटिक्स लिमिटेडकडून ही विमाने तयार केली जातात. त्यात सुखोई या लढाऊ विमानाच्या सरावाचा हा आवाज होता. सरावावेळी विमान जमिनीच्या अगदी जवळून उडत अवकाशात गेले. ज्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाला आणि त्यात दिंडोरी भागातील घरांच्या काचा फुटल्याचे समोर आले.
तर संबंधित प्रकाराबाबत एचएलएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांनी माहिती घेतली. त्यात सुखोई विमानाचा सॉनिक बूम झाल्याने आवाज येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा हा अधिक वेगाने सुखोई विमान हवेत उडते. त्यावेळी हा आवाज येतो. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याची शक्यता आहे. दिंडोरीत हेच घडले असावे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या भागात कुठलीही दुर्घटना घडली नाही. विमान जमिनीच्या जवळून गेल्याने मोठा आवाज झाला. याबाबत अधिक तपास करत असल्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्यावर्षी निफाड तालुक्यातील एका शेतामध्ये सुखोई विमान कोसळले होते. सरावावेळी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली. त्यात अपघातापूर्वी पायलटने पॅराशूटने खाली उडी घेतल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पायलट या अपघातात किरकोळ जखमी झाला होता. हा अपघातही भयंकर होता. दुर्घटनेत संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. त्यावेळी आसपासच्या परिसरात मोठा आवाज झाल्याने लोकांनी शेताच्या दिशेने धाव घेत स्थानिक प्रशासनाला या घटनेबाबत कळवले होते.