लॉटरीचं नशीबच धाेक्यात...! महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद होणार?
By यदू जोशी | Updated: January 18, 2025 08:40 IST2025-01-18T08:38:51+5:302025-01-18T08:40:08+5:30
काहींचे नशीब फळफळले तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली.

लॉटरीचं नशीबच धाेक्यात...! महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद होणार?
- यदु जोशी
मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी...यश आज नाही तर उद्या’ आणि ‘नशिबाला संधीची आवश्यकता असते’ अशा जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्यात येणार आहे.
लॉटरी चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलेले नाही असे कारण देत हा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा प्रस्ताव वित्त विभाग तयार करत आहे. अचानक धनलाभ व्हावा यासाठी गेली साडेपाच दशके करोडो लोकांनी या लॉटरीची तिकिटे काढली.
काहींचे नशीब फळफळले तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली. अनेकांच्या भाग्याची परीक्षा पाहणाऱ्या लॉटरीला आता गाशा गुंडाळावा लागणार आहे. मटका, जुगाराचे व्यसन वाढलेले असताना त्याला पायबंद घालावा या हेतूने १२ एप्रिल १९६९ रोजी राज्य लॉटरीची सुरुवात करण्यात आली होती.
विक्रेत्यांना कमिशन दिल्यानंतर उर्वरित रकमेवर २८ टक्के जीएसटी राज्य सरकारला भरावा लागतो. मोठा आस्थापना खर्चही येतो. हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने लॉटरी बंद करावी असा प्रस्ताव आहे. दुसरीकडे लॉटरी विक्रेता संघटनेचे म्हणणे आहे की लॉटरीची तिकिटे इतर राज्यांमध्ये विकण्यास अनुमती दिली तर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होऊ शकते.
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. २० हजार लॉटरी विक्रेत्यांवर त्यामुळे गदा येणार आहे. सरकारने निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही आंदोलन करू.
- विलास सातर्डेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेना.
प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. सर्व पैलूंचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- आशिष जयस्वाल,
वित्त राज्यमंत्री