मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ; १० महिने घरी कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचेय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 23:56 IST2021-01-24T23:56:26+5:302021-01-24T23:56:46+5:30
पालघर जिल्ह्यातील ५वी ते ८ वीचे वर्ग २७ जानेवारीपासून होणार सुरू

मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ; १० महिने घरी कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचेय !
शशिकांत ठाकूर
कासा : पालघर जिल्ह्यातील ५वी ते ८वीचे वर्ग शासनाच्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार २७ तारखेपासून सुरू होत आहेत. यामुळे गेले आठ-नऊ महिने घरीच राहून कंटाळलेले विद्यार्थी आनंदी झाले असून त्यांना शाळेला जाऊन मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ लागली आहे. दरम्यान, शिक्षकांच्या कोरोना टेस्ट व वर्गांचे सॅनिटायझेशन आदी कामे सुरू करण्यात आलेली आहेत. यासाठी सुमारे चार हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट होणार आहे.
शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू असून इयत्ता ५ वी ते ८वीची जिल्ह्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे. डहाणू ५५०, जव्हार २७०, मोखाडा १७७, पालघर ६०१, तलासरी २०५, वसई २७२, वाडा ३६० अशा एकूण ३३१७ शाळा असून, यामध्ये जिल्हा परिषद २१३१ तर व्यवस्थापनाच्या ११८६ शाळा आहेत.
शिक्षक संख्या डहाणू ६२९, जव्हार २०७, मोखाडा १६७, पालघर २८८, तलासरी २३१, वसई ४३६, विक्रमगड २४०, वाडा २७९ असे एकूण २४७७ शिक्षक आहेत. तर प्राथमिक (पहिली ते पाचवी) वर्गाला अध्यपन करणाऱ्या शिक्षकांची संख्या १५८३ आहे.
विद्यार्थी संख्या डहाणू २२९४४, जव्हार ५६०४, मोखाडा ५४०९, पालघर १०,१५६, तलासरी ९५८८, वसई १६६३८, विक्रमगड ७६४३, वाडा ८६०४ अशी एकूण ८६,५८६ आहे.
मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ
८-९ महिने घरीच राहून अनेक विद्यार्थी कंटाळले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध आलेले आहेत. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटता येईल याची ओढ अनेकांना लागलेली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सुरू होण्याची वाट पाहात होते.शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार असले तरी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनामुळे काहीशी चिंता जाणवत आहे.
८ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते, मात्र शाळा सुरू झाल्याने प्रत्यक्षात अध्यापन होणार असल्याने काही कठीण भाग शिक्षकांकडून समजावून घेता येईल. - श्रेयस ठाकूर, इयत्ता ६ वी
शाळा सुरू होत असल्याने आम्हाला प्रत्यक्षात शिक्षण घेता येईल व शिक्षक आणि मित्रांना भेटायला मिळेल. या सगळ्याचा आम्हाला आनंद आहे. - राज पाटील, इयत्ता ७ वी