LMOTY 2019: गरजूंसाठी स्वस्तात सर्जरी करणारे डॉ. लोकेंद्र सिंग ठरले 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:14 IST2019-02-20T18:46:33+5:302019-02-21T17:14:29+5:30
सर्वसामान्य रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या नागपुरच्या ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (सीम्स) रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या न्यूरो व स्पाइन सर्जन डॉ. लोकेंद्र सिंग यांचा लोकमतच्यावतीने सत्कार करण्यात आला.

LMOTY 2019: गरजूंसाठी स्वस्तात सर्जरी करणारे डॉ. लोकेंद्र सिंग ठरले 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'
मुंबई : सर्वसामान्य रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या नागपुरच्या ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (सीम्स) रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या न्यूरो व स्पाइन सर्जन डॉ. लोकेंद्र सिंग यांचा लोकमतच्यावतीने सत्कार करण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. लोकेंद्र सिंग यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘सीम्स’च्या संचालकपदाची जबाबदारी त्यांच्याकडे येताच तीन वर्षांत रुग्णालयाच्या विकासात त्यांनी भर घातली. यातूनच २०१८ मध्ये रुग्णांना तब्बल दोन कोटी ९७ लाख ६१ हजार १६३ रुपयांची धर्मादाय मदत मिळाली. डॉ. लोकेंद्र सिंग हे जसे निष्णात सर्जन आहेत. डॉ. लोकेंद्र सिंग यांचा जन्म १७ जुलै १९५७ रोजी झाला. एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी एम.एस. (सर्जरी), एम.एच. (न्यूरोसर्जरी), डीएनबी (न्यूरोसर्जरी) अशा अनेक पदव्या घेतल्या आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग रुग्णांसाठी केला. ‘सीम्स’ हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात २०१६ मध्ये ७४ हजार २६३ रुग्णांनी उपचार घेतला. २०१८ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या ८१ हजार २१४ वर पोहचली. अद्ययावत सोई, सुविधांमुळे गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी चार हजार नव्या रुग्णांची भर पडली. न्यूरोसर्जरीसह इतरही शस्त्रक्रियेत वाढ झाली. गेल्या वर्षी एकूण १८७० शस्त्रक्रिया झाल्या. यात १३७९ शस्त्रक्रिया एकट्या न्यूरोसर्जरीशी संबंधित होत्या.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतानाही इतर खासगी हॉस्पिटलच्या तुलनेत या हॉस्पिटलचे शुल्क ५० टक्केही नाही. हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांवर कमीत कमी आर्थिक बोजा पडावा म्हणून गेल्या वर्षीपासून काही औषधी नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.