Mustafa Mujawar : अट्टल गुन्हेगार झाला 'देवमाणूस'; 'इन्साफ फाउंडेशन'च्या मुस्तफा मुजावर यांचा प्रेरणादायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:38 IST2026-02-19T17:37:46+5:302026-02-19T17:38:25+5:30
Mustafa Mujawar : सांगलीतील इन्साफ फाउंडेशनच्या माध्यमातून मुस्तफा २००५ पासून सामाजिक कामात आहेत. ते दहावी अनुत्तीर्ण आहेत. पण ‘सावली निवारा केंद्रा’त बेघर लोकांची सेवासुश्रुषा करतात.

Mustafa Mujawar : अट्टल गुन्हेगार झाला 'देवमाणूस'; 'इन्साफ फाउंडेशन'च्या मुस्तफा मुजावर यांचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या सोहळ्यात केला जातो. लोकसेवा-समाजसेवा, कृषी, शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, राजकारण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी पुरस्काराने गौरविण्यात येतं.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. लोकसेवा-समाजसेवा या कॅटेगरीमध्ये सांगलीच्या मुस्तफा मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.
सांगलीतील इन्साफ फाउंडेशनच्या माध्यमातून मुस्तफा २००५ पासून सामाजिक कामात आहेत. ते दहावी अनुत्तीर्ण आहेत. पण ‘सावली निवारा केंद्रा’त बेघर लोकांची सेवासुश्रुषा करतात. बेघर, निराधार, भटक्या, रस्त्यावर मरणासन्न पडलेल्यांचं संगोपन करतात. आजपर्यंत सुमारे दीड हजार बेवारस मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांचा हा प्रवास असंख्य अडचणींनी भरलेला होता.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दंगली आणि हल्लेखोरीचे गुन्हे डोक्यावर असलेला, पोलीस ठाण्यांच्या चकरा मारणारा एक खंडणीखोर, अट्टल गुंड तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडतो आणि रस्त्यावर उतरून बेघर, मरणासन्न माणसांच्या सेवेत स्वत:ला झोकून देतो; हे सिनेमात पाहिलं तरी कदाचित खोटं वाटेल... पण सांगलीत ही कथा प्रत्यक्षात घडली आहे. या अजब माणसाचं नाव मुस्तफा मुजावर.

अट्टल गुन्हेगार झाला देवमाणूस
मुस्तफा मुजावर सांगतात, “खुनी हल्ला, खंडणी असे गुन्हे करून मी तुरुंगाची हवा खाल्ली. अट्टल गुन्हेगार म्हणून मी आत गेलो पण तिथून बाहेर पडलो तो वेगळाच माणूस होऊन. गुन्हेगारीचा मार्ग का सोडायला हवा याबाबत पोलिसांच्या ‘काउन्सिलिंग’मध्ये ऐकलेलं सगळंच्या सगळं मी स्वतःमध्ये रुजवायचं ठरवलं आणि तिथूनच माझ्यातल्या बदलाची सुरुवात झाली…चांगला माणूस होण्याच्या या प्रवासातच माणुसकी आणि सामाजिक काम या गोष्टी माझ्या अंगाला चिकटल्या. आज ती माझी सगळ्यात मौल्यवान बिरुदं आहेत.”
"मी माझ्या मोठ्या मुलीचं नाव जिजा ठेवलं"
सांगली शहरात ‘लोकमत’ एक रुपयाला मिळत असे तेव्हा पेपरची लाइनही मुस्तफांनी टाकली आहे. दररोज पाचशे अंक टाकण्यापासून त्यांचा दिवस सुरू व्हायचा. मुस्तफांना दोन मुली. एकीचं नाव जिजा आणि दुसरीचं सारा! “छत्रपती शिवरायांच्या आईचं नाव म्हणून मी माझ्या मोठ्या मुलीचं नाव जिजा ठेवलं. मला त्यासाठी खूप त्रास देण्यात आला, पण त्या त्रासाला मी जुमानत नाही.
सावली निवारा केंद्रात बेघर लोकांची सेवासुश्रुषा
शिवराय आणि जिजाऊंवरच्या माझ्या प्रेमाचं ते प्रतीक आहे”, असं मुस्तफा सांगतात. मुस्तफा सांगलीतील इन्साफ फाउंडेशनच्या माध्यमातून २००५ पासून सामाजिक कामात आहेत. ते दहावी अनुत्तीर्ण आहेत. पण ‘सावली निवारा केंद्रा’त बेघर लोकांची सेवासुश्रुषा करतात. बेघर, निराधार, भटक्या, रस्त्यावर मरणासन्न पडलेल्यांचं संगोपन करतात.
दीड हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार
आजपर्यंत सुमारे दीड हजार बेवारस मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. ६०० बेघरांना त्यांच्या कुटुंबांत नेऊन सोडलं आहे. १५० निराधारांचं पुनर्वसन करून त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. सांगलीतील निराधार केंद्रात ते सध्या ८९ भिकारी, मतिमंद, जर्जर आश्रितांचा सांभाळ करतात. दोन रुग्णवाहिकांच्या मदतीने मोफत रुग्णसेवा करतात. २५३ विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतलं आहे. ते सांगतात, आयुष्याचा खरा अर्थ मला उशिरा कळला, पण कळला हे महत्त्वाचं!
लोकसेवा-समाजसेवा कॅटेगरीतील नामांकनं पाहण्यासाठी आणि मत देण्यासाठी इथे क्लिक करा.