Matin Bhosle : शिकार करणाऱ्या हातात पाटी-पेन्सिल! फासेपारधी मुलांचं भविष्य उजळवणारा 'प्रश्नचिन्ह'चा मतीन भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:56 IST2026-02-19T16:55:20+5:302026-02-19T16:56:43+5:30
Matin Bhosle : आपल्या समाजातील मुलांना चांगलं आयुष्य मिळायला हवं असेल तर त्यांनी शिकायला हवं या भावनेतून मतीन भोसले यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली.

Matin Bhosle : शिकार करणाऱ्या हातात पाटी-पेन्सिल! फासेपारधी मुलांचं भविष्य उजळवणारा 'प्रश्नचिन्ह'चा मतीन भोसले
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. ' लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. लोकसेवा-समाजसेवा या कॅटेगरीमध्ये अमरावतीच्या मतीन भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
आपल्या समाजातील मुलांना चांगलं आयुष्य मिळायला हवं असेल तर त्यांनी शिकायला हवं या भावनेतून मतीन भोसले यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली. गुन्हेगारीकडे वळणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी सुरू केलं. यासाठी त्यांनी ‘प्रश्नचिन्ह’नावाची आश्रमशाळा काढली. शिक्षणामुळे त्यांचं आयुष्यच बदललं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मतीन भोसले यांना वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी शेतातली फळं खाल्ली म्हणून एका शेतकऱ्याने तीन तास दोरीने बांधून ठेवलं होतं. पुढे एकदा दुष्काळ पडला असताना शिकार मिळत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी दुसऱ्यांच्या शेतातली सहा ज्वारीची कणसं तोडली. तेव्हा वडिलांना ‘चोर’ ठरवून सहा क्विंटल ज्वारी चोरली या आरोपाखाली शिक्षा झाली. हे असलं सगळं अनुभवतच ते लहानाचे मोठे झाले.

नोकरी सोडली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली
स्वतः फासेपारधी समाजातील असल्यामुळे लहानपणापासून फक्त अन्यायच त्यांच्या वाट्याला आला. पण नशीब, त्यांच्या वाट्याला शिक्षणही आलं. मतीन भोसले शिकले. स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक झाले. पण फासेपारधी मुलांच्या वाट्याला येत असलेल्या दुर्दशेचा डंख मनातून गेला नव्हता. आपल्या समाजातील मुलांना चांगलं आयुष्य मिळायला हवं असेल तर त्यांनी शिकायला हवं या भावनेतून मतीन भोसले यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली.
‘प्रश्नचिन्ह’ नावाची आश्रमशाळा
गुन्हेगारीकडे वळणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम मतीन यांनी सुरू केलं. केवळ राज्यभरातूनच नव्हे झारखंड, चेन्नईसह इतर ठिकाणची रेल्वे स्टेशन, बसस्टँड, सिग्नलवर भीक मागणाऱ्या फासेपारधी समाजाच्या चार हजारांहून अधिक मुलांच्या हाती त्यांनी पाटी-पेन्सिल आणि पुस्तक दिलं आहे. यासाठी त्यांनी ‘प्रश्नचिन्ह’ नावाची आश्रमशाळा काढली.
...तर बहुतांश मुलं गुन्हेगारीकडे वळली असती
२०११ पासून पदरमोड करुन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे ही आश्रमशाळा ते चालवतात. या शाळेत १ ते १० वीपर्यंतचे वर्ग भरतात. सध्या ४७२ पटसंख्या आहे. आतापर्यंत चार हजारांवर विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतलं आहे. ‘प्रश्नचिन्ह’ ही आश्रमशाळा त्यांच्या आयुष्यात आली नसती, तर यातली बहुतांश मुलं पुढे गुन्हेगारीकडे वळली असती... आणि आता? त्यांपैकी अनेक मुलं नोकरी, उद्योगाला लागली आहेत, तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.
लोकसेवा-समाजसेवा कॅटेगरीतील नामांकनं पाहण्यासाठी आणि मत देण्यासाठी इथे क्लिक करा.