हाँगकाँगमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स’ सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 06:53 IST2025-03-17T06:52:36+5:302025-03-17T06:53:40+5:30
देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांना जागतिक स्तरावर मिळणार सन्मान

हाँगकाँगमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स’ सोहळा
नागपूर : भारत गतीने विकासाच्या मार्गावर पुढे जात असून जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताच्या या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींना जागतिक स्तरावर सन्मानित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र व गोव्यातील प्रमुख मराठी वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’तर्फे एक भव्य ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित सोहळा उद्या, सोमवारी (१७ मार्च) रोजी हाँगकाँगच्या शेरेटन हाँगकाँग तुंग चुंग हॉटेल येथे संपन्न होणार आहे.
‘लोकमत’तर्फे भव्य ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट ॲण्ड अवॉर्ड्स २०२५’च्या आयोजनाचा उद्देश देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका वठविणाऱ्या भारत तसेच जागतिक स्तरावरील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय मंचावर ओळख मिळवून देणे हा आहे. येथे अशा मान्यवरांना सन्मानित केले जाईल, ज्यांनी विविध क्षेत्रात असाधारण योगदान दिले आहे. या सोहळ्यासाठी एमआयडीसी, इंट्रिया ज्वेल्स (पूर्वा दर्डा-कोठारी, मुंबई), चंद्रकांत पाटील यूथ फाउंडेशन, स्मिता हॉलिडेज व जी २ स्नॅक्सचे सहकार्य लाभले आहे. या शानदार सोहळ्यात भारत व जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नेते, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते व उदयोन्मुख व्यक्ती सहभागी होतील. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माता सोनू सूद व लोकप्रिय अभिनेत्री अहाना कुमरा या देखील या सोहळ्यात उपस्थित राहतील. या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून या दिग्गज व्यक्तींच्या योगदानाला जागतिक स्तरावर ओळख तर मिळेलच, पण सोबतच त्यांचे कार्य व यशासाठीदेखील त्यांना विशेष सन्मानित केले जाईल.
या सोहळ्यात विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होईल. आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणाली, सतत विकास, सांस्कृतिक वारसा, पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटन व औद्योगिक क्षेत्र यासारख्या विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडतील. हा मंच व्यापार, नावीन्य व आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट संधीदेखील प्रदान करेल. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित हा सोहळा केवळ एक सन्मान कार्यक्रम नाही तर एक अद्वितीय जागतिक मंचही असेल, जेथे जगातील टॉप लीडर्स, इनोव्हेटर्स व चेंजमेकर्स एकत्र येतील व विचारांची आदान-प्रदान करतील. यामुळे भविष्याला नवी दिशा देण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल.
जागतिक मंचावर ‘लोकमत’ समूहाची छाप
महाराष्ट्र व गोव्याचे मुख्य वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’ने आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुबईच्या हयात हॉटेलमध्ये आयोजित ‘लोकमत इंटरनॅशनल अवॉर्ड्स’, सिंगापूर येथे ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेंशन’, अजरबैजान येथे ‘लोकमत वन वर्ल्ड समिट ॲण्ड अवॉर्ड्स २०२४’ व आता हाँगकाँग येथे ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेंशन समिट ॲण्ड अवॉर्ड्स २००५’ भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.
मी हाँगकाँगमध्ये होणाऱ्या ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स’मध्ये सहभागी होण्यासाठी येत आहे. या खास कार्यक्रमाबद्दल खूप उत्सुक आहे आणि तुम्हा सर्वांना भेटण्यासाठीही. मला खात्री आहे की ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स २०२५’ हा केवळ एक कार्यक्रम नसून एक अद्भुत अनुभव असेल, जिथे जगातील सर्वोच्च नेते, इनोव्हेटर्स आणि चेंजमेकर्स एकत्र येतील व विचारांची देवाणघेवाण करतील. या व्यासपीठाच्या माध्यमातून भविष्याची पुनर्परिभाषा केली जाईल आणि जगाच्या विकासाची एक नवीन दिशा निश्चित केली जाईल.
सोनू सूद, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि चित्रपट निर्माता
१७ मार्च रोजी हाँगकाँगमध्ये ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स २०२५’ला ‘होस्ट’ करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या भव्य कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होतो. मला खात्री आहे की हा कार्यक्रम प्रेरणादायी, ग्लॅमर आणि उत्सवाचा परिपूर्ण संगम असेल. या अद्भुत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, चला आपण सर्व मिळून तो संस्मरणीय बनवूया!
- अहाना कुमरा, प्रसिद्ध अभिनेत्री
सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हाँगकाँगमध्ये ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांत आपले कौशल्य सिद्ध करणारे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व या सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.
करण दर्डा, कार्यकारी संचालक आणि संपादकीय संचालक, लोकमत मीडिया प्रा. लि.
लोकमत मीडिया समूहातर्फे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना परदेशात नेऊन सन्मानित करणे, ही अभिमानाची बाब आहे. या भव्य सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकसेवकाचा समावेश केल्याबद्दल ‘लोकमत समूहा’चे मनःपूर्वक आभार.
चंद्रकांत निंबाजी पाटील, आमदार, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ, जि. जळगाव.
स्मिता हॉलिडेजला हाँगकाँग आणि मकाऊ येथे होणाऱ्या प्रतिष्ठित ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स २०२५’ची ट्रॅव्हल पार्टनर असल्याचा अभिमान आहे. पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि या प्रेरणादायी कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे.
जयंत गोरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, स्मिता हॉलिडेज
ईव्ही क्षेत्रात भारतामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि आपला देश या क्षेत्रातील जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अशावेळी ‘लोकमत’सारख्या नामांकित वृत्तपत्र समूहाने ईव्ही उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तीचा जागतिक व्यासपीठावर गौरव केला तर ती भारतासाठी अभिमानाची बाब तर ठरेलच, शिवाय देशाच्या झपाट्याने वाढणाऱ्या ईव्ही क्षेत्राला नवी ओळख आणि प्रेरणा मिळेल.
सिद्धांत वोरा, मार्केटिंग लीड, ग्रीव्हज मोबिलिटी प्रा. लि.