सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 17:31 IST2019-05-12T17:27:28+5:302019-05-12T17:31:17+5:30
शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं सरकारपर्यंत पोहचवण्याच काम करू, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेईन.

सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू : शरद पवार
मुंबई - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपल्या आणि नेतेमंडळी रिलॅक्स मोडमध्ये आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला दुष्काळी दौरा सुरु केला आहे. सरकारने दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले तर, सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा शरद पवार यांनी दिला. रविवारी ते सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्वसामान्य नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गत वर्षी पाऊस कमी पडला त्यामुळे या वर्षी दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. असे शरद पवार म्हणाले,
आमच्या काळात दुष्काळग्रस्त दौऱ्याच्या वेळी आम्ही गोळी पेंड चारा छावण्यांमध्ये पुरवली जात होती. चारा छावण्यांमधील जनावरांच्या दुधामध्ये चांगली वाढ झाली होती. मात्र, आताच सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देताना कुठेही दिसून येत नसल्याचा आरोप पवार यांनी केला.
शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं सरकारपर्यंत पोहचवण्याच काम करू, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेईन. शेतकऱ्यांचं दुःख सरकार समोर मांडेन त्यानंतरही सरकारला जर जाग आली नाही तर सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू, असा इशाराही पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.