Lok Sabha Election 2019: राज्यसभा सोडून संजय काकडे पळत्या लोकसभेच्या मागे लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:46 AM2019-03-12T03:46:24+5:302019-03-12T07:02:14+5:30

पक्षांतर्गत बंदी कायद्याचा फटका; काँग्रेस प्रवेश की खासदारकी?

Lok Sabha Election 2019: Sanjay Karkar to leave the Rajya Sabha | Lok Sabha Election 2019: राज्यसभा सोडून संजय काकडे पळत्या लोकसभेच्या मागे लागणार?

Lok Sabha Election 2019: राज्यसभा सोडून संजय काकडे पळत्या लोकसभेच्या मागे लागणार?

Next

पुणे : राज्यसभेच्या खासदारकीचा उर्वरीत कार्यकाळ गमावण्याची तयारी ठेवून खासदार संजय काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी चालवली आहे. राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार असलेल्या संजय काकडे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी जंग जंग प्रयत्न चालवले आहेत. मात्र ही उमेदवारी मिळवण्यासाठी काकडे यांना राज्यसभेच्या खासदारकीवर आधी पाणी सोडावे लागणार आहे.

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘‘पक्षांतरबंदी कायद्यान्वये राज्यसभेत सहयोगी सदस्यत्व स्विकारलेले असेल तर दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येत नाही. एका पक्षाचा सहयोगी सदस्यत्व स्विकारलेला राज्यसभा सदस्य ज्या क्षणी दुसऱ्या पक्षाचे सदस्यत्व किंवा उमेदवारी स्विकारतो, त्या क्षणी त्याची राज्यसभेतील खासदारकी आपोआप रद्द होते.’’ संजय काकडे हे एप्रिल २०१४ मध्ये अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले. काकडे यांची राज्यसभेची दोन वर्षांची मुदत अजून बाकी आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काकडे यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. ‘‘कॉंग्रेसकडून माझी उमेदवारी निश्चित आहे,’’ असे काकडे यांनी रविवारी (दि. १०) जाहीर केले. या वक्तव्याला चोवीस तास उलटत नाहीत तोवरच काकडे सोमवारी (दि. ११) रात्री अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर पोचले. ‘‘या भेटीमध्ये पक्षात मानसन्मान जपण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काकडे यांना दिले, परंतु पुण्याची उमेदवारी मिळणार नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

काकडे यांचे व्याही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मध्यस्थीने काकडेंची मुख्यमंत्री भेट घडून आली. मात्र या भेटीनंतरही काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचाच पुनरुच्चार केला आहे. त्या परिस्थितीत राज्यसभेची उमेदवारी गमवण्याची तयारी काकडेंना ठेवावी लागणार आहे. लोकसभेवर निवडून जाण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये काकडे यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेकांची भेट घेतली आहे. मात्र यासंदर्भात भाजपाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया व्यक्त करण्यात
आलेली नाही. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची उमेदवारी मिळवणे आणि त्यानंतर निवडणूक जिंकणे या अनिश्चिततेची टांगती तलवार डोक्यावर ठेवून काकडे राज्यसभा खासदारकीवर पाणी सोडणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

...पण मुख्यमंत्र्यांशी मैत्री कायम
राज्यसभा खासदार होण्यापूर्वी पासून माझे मुख्यमंत्र्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. मी काँग्रेसमध्ये जातो आहे हे सांगण्यासाठीच त्यांची भेट घेतली. भाजपचे प्रदेश पातळीवरील आणि स्थानिक नेत्यांच्या कारभाराला कंटाळून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरची माझी मैत्री कायम राहणार आहे.
- संजय काकडे

संभाव्य ‘आयारामां’मुळे काँग्रेस निष्ठावंत चिंतेत
उमेदवार लादला जाण्याची भिती : प्रचाराला कोणी बाहेर पडेना
लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेने पुण्यातील अन्य राजकीय पक्षांमध्ये उत्साह सळसळला असला तरी पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसजन मात्र चिंतीत झाले आहेत. पक्षाकडून बाहेरचा उमेदवार लादला जाण्याची खात्रीच त्यांना आता वाटू लागली आहे. त्याचा परिणाम पक्षाच्या प्रचारावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाचे सहयोग खासदार संजय काकडे आणि शेतकरी कामगार पक्ष व संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी प्रविण गायकवाड हे दोघेही काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मागत आहेत.

दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या काँग्रेस नेत्यांच्या भेटी काकडे व गायकवाड यांनी घेतल्या आहेत. आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचे काकडे जाहीरपणे सांगू लागले आहेत. काँग्रेसने नव्या, तरूण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला असून त्यात आपण बसतो आहोत व पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडून तसे संकेत मिळाले आहेत, असे गायकवाड म्हणत आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी उमेदवारी मागितली आहे. हे सगळेच एकनिष्ठ काँग्रेसजन मानले जातात.

निष्ठावंत काँग्रेसजनांनी रितसर ठराव करून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र पक्षाने यांच्यापैकी कोणाच्याच नावावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही ही शंका काँग्रेसजनांना वाटू लागली आहे. पक्षाच्या दुसºया फळीतील, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाºया पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाबरोबर निष्ठावान असलेल्याच उमेदवारी मिळावी असे वाटते. त्यामुळेच बाहेरचा उमेदवार लादला तर फक्त तोंडदेखला प्रचार करण्याची चर्चा आत्ताच काँग्रेस वर्तुळात सुरू झाली आहे. याचा फटका पक्षाच्या प्रचारला बसण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस भवनातून मिळत आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019: Sanjay Karkar to leave the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.