निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:48 IST2025-10-29T11:45:07+5:302025-10-29T11:48:42+5:30
NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील ऍक्शन मोडमध्ये.

निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंद मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रात पहिले उमेदवार ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
जयंत पाटील यांची राजकीय खेळी
आनंद मलगुंडे हे जयंत पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या आरक्षणात नगराध्यक्षपदाची जागा ही ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आनंद मलगुंडे यांना ही उमेदवारी दिली आहे. आनंद मलगुंडे हे धनगर समाजातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहेत. शिवाय मलगुंडे यांनी याधीही नगराध्यक्ष पदाचे सूत्र सांभाळले असल्याने एका अनुभवी व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे देखील अधोरेखित होते.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्य करून जयंत पाटील यांना घेरण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरू होते. मात्र, या विषयांकडे दुर्लक्ष करत आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.