.. 'loadshedding' to be carried out in summer in other states | महाजेनकोची अनेक युनिट्स बंद; यंदाच्या उन्हाळ्यात राज्याला ‘लोडशेडिंग’चे चटके?

महाजेनकोची अनेक युनिट्स बंद; यंदाच्या उन्हाळ्यात राज्याला ‘लोडशेडिंग’चे चटके?

नागपूर : राज्याची वीज उत्पादक कंपनी महाजेनकोतर्फे नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. १०१७० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता असलेल्या विद्युत केंद्रात सध्या केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे फेब्रुवारीत विजेची मागणी सातत्याने २१ हजार मेगावॅटच्या स्तरापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागेल, अशी स्थिती दिसून येत आहे.

गत बुधवारी राज्यात विजेची मागणी थेट २१५७० मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली. यापूर्वी २३ ऑक्टोबर २०१८ ला २०७४५ मेगावॅट मागणीचा रेकार्ड नोंदविण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये नोंदविलेल्या मागणीचा विचार करता यावर्षी ३३२० मेगावॅटपेक्षा अधिक मागणी राहिली, जी १८ टक्के अधिक आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता २१,३९२ मेगावॅटची मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने केंद्रासह खासगी संयंत्राच्या भरवशावर ही वाढलेली मागणी पूर्ण करून स्वत:ची पाठ थोपाटून घेतली असली तरी उन्हाळ्यात विजेची मागणी २५ हजार मेगावॅटच्यावर गेल्यास राज्यात भारनियमन लागू करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

एनटीपीसी आणि एनपीसीआयएल यांच्याकडून ४१३४ मेगावॅट वीज घेण्यात आली आहे. याशिवाय अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्ल्यू, एम्को आदी खासगी कंपन्यांकडून ४५६७ मेगावॅट वीज घेतल्याने राज्यात भारनियमनाची गरज पडली नाही. मात्र वाढत्या मागणीने महावितरणचे अधिकारी चिंतेत पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुसरीकडे महाजेनकोच्या अनेक केंद्रावर संकट निर्माण झाले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने त्यांना बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट ३ सह नाशिक व परळी येथील युनिटचा समावेश आहे. चंद्रपूरची युनिट क्रमांक ५ आणि ६ आधीच बंद आहेत आणि कोराडीच्या युनिट क्रमांक ६ आणि ७ ची स्थितीसुद्धा सारखीच आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला खासगी संयंत्राचा आधार घ्यावा लागत आहे.

बंद युनिट सुरू करणार, कोयना सोलरचा आधार
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतर्फे लोड मॅनेजमेंटच्या माध्यमातून उन्हाळ््यातील वाढती मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील. यासाठी महाजेनकोचे बंद पडलेले युनिट सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. रतन इंडियाच्या बंद पडलेल्या १०८० मेगावॅटचे संयंत्र सुरू करण्यात येईल. कोयना धरणात मुबलक पाणी असल्याने तेथे जल विद्युतचे उत्पादन वाढवून संकटाचा सामना करण्यात येईल.

Web Title: .. 'loadshedding' to be carried out in summer in other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.