मुंबई - मला दिल्लीपेक्षा मुंबईतलं वातावरण आवडतं. मला महाराष्ट्राची जबाबदारी दिलीय त्यामुळे ती उत्तमपणे सांभाळण्याचा प्रयत्न मी करतोय असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात न जाण्याचे संकेत दिले आहेत. माजी मंत्री जयंत पाटील यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ पुरस्कार' सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीसांनी दिलखुलासपणे विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
या मुलाखतीत जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला की, नरेंद्र मोदींचे ७५ वर्ष पूर्ण होतील, ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत अशी तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल यात काही शंका नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस...या सगळ्यात देवेंद्र फडणवीस आपल्याला कुठे पाहतात..? त्यावर देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे उत्तर देत मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही. २०२९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवेत. ही आमची इच्छा आहे. ती लादण्याचा प्रयत्न करू असं सांगितले.
मोदी फिजिकल फीट, २०२९ ला तेच पंतप्रधान हवेत
७५ वर्षाची सीमा मोदींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही. मोदी फिजिकल फिट आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे २०२९ साली मोदींनीच पंतप्रधान व्हावे ही पक्षातील सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही ही इच्छा लादण्याचा प्रयत्न करू. देवेंद्र फडणवीस पक्षाचा असा कार्यकर्ता आहे ज्याला जिथे टाकाल तिथे तो फिट आहे. आज तरी मला पक्षाने महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रात दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन असं देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत सांगितले.
दरम्यान, या नेत्यांच्या मांदियाळीत मला चौथ्या नंबरवर आणलं त्यासाठी आभार परंतु मला माझ्या क्षमता आणि मर्यादाही माहिती आहेत. मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही. मी मुंबईत अतिशय खुश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईतला वातावरण उत्तम आहे. मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीत नाही. त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यावर बरेच जण डोळे लावून बसलेत, २ वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील असं सांगत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून कोपरखळी मारली.