लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण; नाईक यांना अटक करून चौकशी करणार - रूपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:09 IST2022-04-18T08:08:07+5:302022-04-18T08:09:44+5:30
चाकणकर म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगात ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगात प्रत्यक्ष उपस्थित राहत या महिलेने घटनेचा वृतांत सांगितला व तक्रार दाखल केली.

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण; नाईक यांना अटक करून चौकशी करणार - रूपाली चाकणकर
मुंबई : भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. नाईक यांना अटक करून चौकशी आणि पुढील कारवाई केली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रविवारी सांगितले.
चाकणकर म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगात ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगात प्रत्यक्ष उपस्थित राहत या महिलेने घटनेचा वृतांत सांगितला व तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करून ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १५ तारखेला नवी मुंबई पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्या विरोधात आयपीसी ५०६ ब हा गुन्हा दाखल झाला. १६ तारखेला नेरूळ पोलीस ठाण्यात आयपीसी ३७६ हा गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेले दोन्ही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असून, गणेश नाईक यांना अटक करून त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अडचणीत वाढ -
- ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एका महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत त्याच महिलेच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
नाईक यांच्या विरोधात १९९३ पासून एका महिलेला लग्नाचे आमिष देऊन व जीवे मारण्याची धमकी देऊन शोषण केले. आमिषाला आणि त्यांनी दिलेल्या धमकीमुळे ही महिला त्यांच्यासह लिव्ह-इनमध्ये आहे. या संबंधातून त्यांना १५ वर्षांचा मुलगा आहे. पीडित महिलेने लग्नाची मागणी केल्यावर नाईक यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. वैवाहिक अधिकार व मुलाला पितृत्वाचा अधिकार मागितला असता मुलासह जीवे मारण्याची धमकी दिली. नाईक यांचा मुलगा संदीप नाईक जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार या महिलेने आयोगाकडे केली होती.