घराघरात, मनामनात आनंदोत्सव साजरा होऊ दे; शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना काय म्हणाले अजित पवार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 09:17 IST2025-02-19T09:17:17+5:302025-02-19T09:17:56+5:30
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन.

घराघरात, मनामनात आनंदोत्सव साजरा होऊ दे; शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar: "छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.
शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना अजित पवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना वंदन केलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.