विधिमंडळ सचिव सक्तीच्या रजेवर? अधिकाऱ्यांच्या बैठकीत राम शिंदे, राहुल नार्वेकरांचा दणका

By यदू जोशी | Updated: June 7, 2025 10:44 IST2025-06-07T10:42:48+5:302025-06-07T10:44:19+5:30

विधिमंडळाची प्रतिष्ठा कमी होईल, असे वागले तर मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाईल, असेही राम शिंदे म्हणाले

Legislative Secretary on forced leave Ram Shinde Rahul Narvekar clash in officers meeting | विधिमंडळ सचिव सक्तीच्या रजेवर? अधिकाऱ्यांच्या बैठकीत राम शिंदे, राहुल नार्वेकरांचा दणका

विधिमंडळ सचिव सक्तीच्या रजेवर? अधिकाऱ्यांच्या बैठकीत राम शिंदे, राहुल नार्वेकरांचा दणका

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तुमचे सार्वजनिक अन् कार्यालयीन वर्तन चांगलेच असले पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राला उत्तरदायी आहात हे लक्षात ठेवा. त्यानुसार वागा, असे खडे बोल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी एका बैठकीत विधान भवनच्या अधिकाऱ्यांना सुनावले. विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे स्पष्ट संकेत शिंदे यांनी यावेळी दिले. विधिमंडळाची प्रतिष्ठा कमी होईल, असे वागले तर मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

विधानसभा अंदाज समितीच्या धुळ्यातील दौऱ्यादरम्यान समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीत १.८४ कोटी रुपये सापडल्यानंतर विधिमंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागलेले असताना शिंदे, नार्वेकर यांनी विधानभवनात बैठक घेतली. दोन्ही सभागृहांतील आमदारांची नीतीमूल्य समिती स्थापन करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्याचे काय झाले? उपसचिव सहसचिवांना कामांचे वाटप दीड वर्षांपासून का केले नाही? तिघांना सचिव म्हणून ४ महिन्यांपूर्वी पदोन्नती दिली त्यांनाही जबाबदाऱ्यांचे वाटप का केले नाही? असे प्रश्न शिंदे, नार्वेकर यांनी भोळे यांना केले. गोलगोल उत्तरे देऊ नका, ४८ तासांत जबाबदाऱ्यांचे वाटप करा, असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सांगूनही नीतीमूल्य समिती स्थापन झाली नाही, समिती लवकर स्थापन करा, असे मी सतत सांगत आहे. विधानमंडळाच्या दृष्टीने आवश्यक नऊ प्रस्ताव दिलेले आहेत, त्यावरही फाईल तयार करत नाही. असेच सुरू राहणार असेल तर भोळे यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा प्रस्ताव तयार करून विशेष मंडळात (या मंडळात मुख्यमंत्री आणि सभापती व अध्यक्ष असतात) त्याला मंजुरी दिली जाईल, असे राम शिंदे म्हणाले.

Web Title: Legislative Secretary on forced leave Ram Shinde Rahul Narvekar clash in officers meeting