मुंबई : विधानपरिषदेतील पाच रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने रविवारी संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे या तिघांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने या तिघांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
विधानपरिषदेवरील सदस्य हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या, त्या जागांवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. महायुतीत या पाच जागांपैकी तीन जागा भाजप, एक शिंदेसेना आणि एक अजित पवार गटाकडे आहे.
निवडणूक बिनविरोध होणारविधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. विरोधकांकडे विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने ते उमेदवार देण्याची शक्यता नाही. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून विरोधकांकडून रात्री उशीरापर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे विधानपरिषदेची ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
असा आहे विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम१७ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १८ मार्च अर्जांची छाननी २० मार्च अर्ज मागे घेण्याची मुदत २७ मार्च सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान २७ मार्च सायंकाळी ५ वाजल्यानतंर मतमोजणी
१३ महिन्यांचा कार्यकाळ विधानपरिषदेच्या या पाचही रिक्त जागांचा कार्यकाळ हा मे २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे या जागेवर निवडून जाणाऱ्या सदस्यांना अवघ्या १३ महिन्यांची संधी मिळणार आहे.
मराठवाड्यातून भाजपने दिला मायक्रो ओबीसी चेहरा छत्रपती संभाजीनगर येथील संजय केणेकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपसाठी बुथपातळीपासून काम केलेल्या केणेकर यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.१९८८ साली अभाविप मधून केणेकर यांनी राजकीय प्रवास सुरू केला. पुढे भाजप वॉर्ड अध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अशी १२ वर्षे संघटनात्मक काम त्यांनी केले. ते छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर देखील राहिले आहेत. मायक्रो ओबीसी चेहरा म्हणून केणेकर यांचा विचार झाला आहे.
मुख्यमंत्र्यांचे मित्र संदीप जोशींना संयमाचे फळ संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत. महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षदेखील होते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत. फडणवीस उपमुख्यमंत्री असताना ते त्यांचे मानद सचिव होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर पश्चिम मतदारसंघातून संदीप जोशी इच्छुक होते. त्यांचे वडील दिवंगत दिवाकरराव जोशी विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातून ते भाजपकडून रिंगणात उतरले होते. मात्र, काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
केचे यांना दिलेला शब्द भाजप नेतृत्वाने पाळला दादाराव केचे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तेथे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि पीए राहिलेले सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी केचे यांनी बंडखोरीची भूमिका घेतली होती. तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर दिवे हे केचे यांच्यासह विशेष विमानाने अहमदाबाद येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते.यावेळी माघार घ्या तुम्हाला विधान परिषदेवर पाठवू, असा शब्द केचे यांना पक्षनेतृत्वाकडून देण्यात आला होता.