साहाय्यक संपादक पद सोडून शेतीकडे
By Admin | Updated: March 15, 2015 01:21 IST2015-03-15T01:21:26+5:302015-03-15T01:21:26+5:30
शहरातील जीवनशैली अंगीकारली की गलेलठ्ठ पगारासाठी दिवस-रात्र मेहनत करणे आणि दोन सुखाच्या क्षणांसाठी सुटीची वाट पाहात राहणे हे नशिबी येते.

साहाय्यक संपादक पद सोडून शेतीकडे
शहरातील जीवनशैली अंगीकारली की गलेलठ्ठ पगारासाठी दिवस-रात्र मेहनत करणे आणि दोन सुखाच्या क्षणांसाठी सुटीची वाट पाहात राहणे हे नशिबी येते. पण अनेकदा शहरी वातावरणात वाढलेल्या व्यक्तींना ‘हेच खरे आयुष्य’ असे वाटू लागते. यामुळे स्वत: व्यवसाय सुरू करायचा, स्वत:साठी काम करायचे असे तरुणपणात पाहिलेले अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहते.
धावत धावत जगताना त्यांना थांबताच येत नाही. पण दादरच्या सुमित भोसले याने गावी जाऊन व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मासिकातील साहाय्यक संपादकाच्या पदाचा राजीनामा दिला आणि शेती करण्यासाठी त्यांनी सावंतवाडीची वाट धरली.
मुंबईतच मी लहानाचा मोठा झालो. लहानपणापासून स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा, असे मनात होते. पण नक्की काही ठरवले नव्हते. मुंबईतच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. फिजिक्स विषयात बीएस्सी केल्यावर आॅडिओ रेकॉर्डिंग आटर््सचा डिप्लोमा केला. शाळेनंतर मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. ट्रेकिंग करायला सुरुवात केल्यावर पुढच्या काही वर्षांत शहर सोडून गावाकडे राहायला जायचे, असे मनात पक्के केले. पण त्या वेळीही ट्रेकिंगशी निगडीत एखादा व्यवसाय गावाकडे सुरू करायचा असेच डोक्यात होते.
महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मासिकात नोकरी मिळाली. याचबरोबरीने आॅडिओ रेकॉर्डिंगचा कोर्स केल्यामुळे त्या क्षेत्रातही थोडेफार काम सुरू केले. दोन्ही क्षेत्रांत कल्पकतेला वाव होता. पहिले काही दिवस काम करायला खूप मजा आली. कल्पकता वापरून नवनवीन गोष्टी करता येत होत्या. पण एक - दोन वर्षांतच हे सगळे काम चाकोरीबद्ध झाले. मुंबईसारख्या शहरात आॅडिओचे काम करताना कल्पकतेपेक्षा पैशाला महत्त्व असल्यामुळे त्याच पद्धतीने काम करणे भाग होते. कॉर्पोरेट जगात वावरताना एक ओळख निर्माण होत होती, चांगले पैसे मिळत होते. मासिकात मला कामामुळे बढती मिळत गेली. या वेळी मनात विचार सुरू होता, की वयाच्या ३५ वर्षांनंतर नोकरी सोडायची. तोपर्यंत पैसे साठवायचे. मग साठवलेल्या पैशातून गावाकडे जाऊन चाळिशीत व्यवसाय सुरू करायचा. पावणेदोन वर्षांपूर्वी साहाय्यक संपादक पदाचा राजीनामा देऊन शेतीकरिता पत्नीसह सावंतवाडीला राहण्यास आलो.
सावंतवाडीला काही एकर जमीन होती. या जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यावर पत्नी अक्षयाने तत्काळ होकार दिला. मुंबईतील तिची नोकरी सोडून तीही सावंतवाडीला येऊन राहण्यास तयार झाली. निर्णय घेतला, पण या विषयातले ज्ञान नव्हते. मग आधी शेळीपालन करायचे ठरवले. शेळीचे संगोपन कसे करायचे, त्यांचे आजार कोणते, त्यांना खायला काय द्याव,े याचा दोन वर्षे अभ्यास केला. शेळीपालनात थोडा जम बसल्यावर मी सावंतवाडीला पूर्णपणे शिफ्ट झालो़ जमिनीची मशागत करून त्यावर भाज्या लावायला सुरुवात केली.
जमिनीच्या काही भागात भातशेती होती. पण हा भात मार्केटमध्ये विकण्यास भात कसे लावायचे याचा अभ्यास सुरू केला. पण भातशेतीलाही वेळ लागतो. मग मी भाज्या, पपई, कलिंगड लावले. अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. उत्पादन कमी असल्यामुळे उत्पन्न कमी आहे. शहरात धकाधकीच्या आयुष्यात पैसे मिळत होते, पण इथे मानसिक समाधान मिळते आहे.
शहरात राहायचे असेल तर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. नोकरी करीत असतानाच गावाकडे व्यवसाय करणे शक्य नव्हते. माझे लग्न झाले. जबाबदारी वाढली. भविष्याचा विचार करताना एक जाणवले, की आताच मुंबई सोडली नाही तर पुढच्या काही वर्षांमध्ये मुंबई सोडून जाणे शक्य होणार नाही. जबाबदाऱ्या वाढलेल्या असतील, मग त्या पूर्ण करण्यासाठी अजून पैसे लागणार. या वेळी साठवलेले पैसेदेखील कमी वाटतील. यात अडकायचे नसेल तर आताच नोकरी सोडून गावी गेले पाहिजे, हे उमजले. सावंतवाडीला असलेल्या जमिनीवर शेती करायची, असे मी ठरवले.
पूजा दामले