Ajit Pawar on MLA's Behavior: अरे निदान मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी सोड; अजित पवारांनी घेतली बेशिस्त आमदारांची शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:05 IST2021-12-28T15:03:10+5:302021-12-28T15:05:18+5:30
Ajit Pawar on MLA's Behavior Maharashtra Assembly: आता सभागृहातील कामकाज लाईव्ह होते. तीस, पस्तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना मान देत होतो. आता अध्यक्षांकडे पाठ केली जाते, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar on MLA's Behavior: अरे निदान मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी सोड; अजित पवारांनी घेतली बेशिस्त आमदारांची शाळा
या वेळचे हिवाळी अधिवेशन हे आमदारांची बेशिस्त, गंभीर आरोप आणि सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर गाजत आहे. नितेश राणे यांनी केलेले मॅव मॅव, अजित पवारांवरील राज्य विकण्याची टीका, नितेश राणे यांचे एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यात आलेले नाव आदी विषय गंभीरपणे चर्चिले गेले आहे. अजित पवारांनी यावर आमदारांना शिस्तपालन करण्यासाठी शाळा घेतली.(Maharashtra Assembly Winter Session)
आता सभागृहातील कामकाज लाईव्ह होते. तीस, पस्तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना मान देत होतो. आता अध्यक्षांकडे पाठ केली जाते. येताना अध्यक्षांना नमस्कार करायचा आणि बसायचे, जाताना नमस्कार करून जायचे. आता कोणीच ते नमस्कार करत नाही, आमदार झालो म्हणजे आपल्याला सारे कळते, असे अनेकजण वागू लागले आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.
आमच्या काळात मंत्र्याच्या मागे बसून त्यांच्याशी बोलायचो. आता दहा दहा मिनिटांनी आमदार पत्र द्यायला येतात, असे सांगताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीबाबत काही दिवसांपूर्वी घडलेला किस्सा सांगितला. एका आमदार हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये येऊन बसला. त्याला म्हणालो, अरे ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, निदान ती तरी सोड. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस, आजकाल कोणीही कुठेही फिरत असतो, क्रॉस करत असतो. मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता आमच्या जागेवरही येऊन बसतात, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
आमदारांना सभागृहाबाहेर उभे करा...
सभागृहातील शिस्तीवर भाष्य करताना विधानसभा अध्यक्षांना अशा आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. अशा आमदारांना सभागृहाबाहेर चार तास उभे करण्याची शिक्षा करा, जास्तच असेल तर दिवसभर उभे करा. तरच यांना शिस्त लागेल. सभागृहाचा शिष्टाचार पाळला गेला पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
संबंधीत बातम्या...