लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती वापराचे पाणी नद्यांवाटे मोठ्या धरणांमध्ये जात असल्याने धरणांचेपाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असताना आता त्याला चाप लावण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिले असून, या मुद्द्यावर तत्काळ बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.
पाणी प्रदूषण रोखण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची विशिष्ट मुदतीत उभारणी करण्याची सक्ती करणे, अस्तित्वात असलेल्या पाणी प्रदूषण कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणे अशा उपाययोजना निश्चितपणे केल्या जातील, असे महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
- महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रेटच्या वाढत्या प्रमाणाबद्दल आणि त्यातून होणाऱ्या अपायांबद्दल ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात दिलेल्या वृत्ताची मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेतली.
- धरणांमधील दूषित पाण्याचा विषय ऐरणीवर आणून त्याविषयी ठोस निर्णय घेण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री जेव्हा यासंदर्भात बैठक घेतील तेव्हा कृषीमंत्री आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून भूजलात नायट्रेटच्या वाढत्या प्रमाणाबद्दलदेखील गांभीर्याने चर्चा व्हावी, असा आपला प्रयत्न असेल, असे महाजन म्हणाले.