जळगाव - ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने लाभार्थी १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठविली आहे. या यादीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमध्ये पडताळणीवर अधिक भर देण्यात न आल्याने निकषात न बसणाऱ्या अनेक जणांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पडताळणीमध्ये उघड झाले आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेत विविध जिल्ह्यांत घुसखोरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वाधिक कारवाई सोलापूर, बुलढाणा, लातूर, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुरुषांचाही समावेशदरम्यान, या यादीत १६ वर पुरुष लाभार्थींचाही समावेश आहे. तर ८१ लाभार्थ्यांच्या जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, जिल्हानिहाय लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे.