Ladki Bahin Yojana: अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींची मागणी, आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:37 IST2026-01-20T15:37:01+5:302026-01-20T15:37:51+5:30
Ladki Bahin Yojana Stopped news: राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण योजना' आता तांत्रिक कचाट्यात सापडली असून, लाभार्थी महिलांनीच आता ही योजना बंद करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

Ladki Bahin Yojana: अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींची मागणी, आंदोलन
Ladki Bahin Yojana News: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. केवायसीमध्ये संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारण्यात आल्याने त्यांना उत्तरे देऊनही अनेकांचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता बंद झाला आहे. यामुळे या महिला त्रस्त झाल्या असून ही लाडकी बहीण योजनाच बंद करा अशी धक्कादायक मागणी आज यवतमाळमध्ये आंदोलनाला बसलेल्या लाडक्या बहिणींनी केली आहे.
यवतमाळ, वर्धा, बुलढाण्यात हजारो महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठरू लागल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून महिलांना हप्ता मिळाला नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. वर्ध्यात राष्ट्रवादी शरद पवार युवती यांच्या नेतृत्वामध्ये महिलांनी थेट जिल्हाधिकारीकार्यालयावर धडक दिलेली आहे. केवायसी वेळी गुगलीसारखा अर्थ निघणारे प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी उत्तरे चुकल्याने या लाडक्या बहिणींचे पैसे येणे बंद झाले आहेत. अनेक महिला तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी फेऱ्या मारत असून अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही. दिवसाला ४०० ते ५०० महिला तक्रार करत असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या तक्रारदार महिलांकडून एक अर्ज घेतला जात असून पुन्हा केवायसी प्रक्रिया सुरु करता येते का यासाठी ते अर्ज पुढे पाठविले जात आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. बुलढाण्यात सुमारे ३० हजार महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत. राज्यभरात हा आकडा लाखांमध्ये जात आहे. एकीला पैसे येतात, दुसरीला येत नाहीत यामुळे वाद वाढत असल्याची प्रतिक्रियाही या महिलांनी दिली आहे. यामुळे एकतर पैसे द्यायचे तर सर्वांना द्या नाहीतर ही योजनाच बंद करा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.