‘एफडीए’च्या प्रयोगशाळांमध्ये मनुष्यबळाची वानवा; राज्यभरात ५७ पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 08:04 AM2024-01-07T08:04:41+5:302024-01-07T08:05:04+5:30

२८ जणांवर कामाचे ओझे; नमुन्यांच्या अहवालाला विलंब होत असल्याचे माहिती अधिकारात उघड

Lack of manpower in FDA laboratories; 57 posts vacant across the state | ‘एफडीए’च्या प्रयोगशाळांमध्ये मनुष्यबळाची वानवा; राज्यभरात ५७ पदे रिक्त

‘एफडीए’च्या प्रयोगशाळांमध्ये मनुष्यबळाची वानवा; राज्यभरात ५७ पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या कारवायांमध्ये जमा केलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात होणाऱ्या विलंबावर उपाय म्हणून राज्याच्या सातही विभागात फिरत्या प्रयोगशाळेच्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मात्र, या विभागात मनुष्यबळाच्या कपातीचे वास्तव विदारक आहे. राज्यभरात एफडीएच्या प्रयोगशाळांमध्ये एकूण ८५ मंजूर पदांपैकी केवळ २८ पदेच कार्यरत आहेत. प्रयोगशाळांमधील ५७ पदे रिक्त असल्यामुळे नमुन्यांच्या अहवालाला विलंब होत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या अन्न व औषधांसंदर्भातील कारवायांतील नमुने तपासण्यासाठी अनेकदा महिनोमहिने जातात. मागील वर्षात दिवाळीत घेतलेले नमुने आता फेब्रुवारी अखेरीसपर्यंत आल्यावर संबंधित विक्रेते, उत्पादक आणि वितरकांवर कारवाई करण्यात येईल. अन्न व औषधांचे नमुने तपासणीच्या होणाऱ्या विलंबाला एफडीए प्रयोगशाळांमधील मनुष्यबळांची कमतरता हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे या विभागातील मनुष्यबळाची समस्या दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होणार आहे. फिरत्या प्रयोगशाळांचा घाट घालत असताना राज्य शासनाने आणि  अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम विभागाची मूलभूत समस्या असणाऱ्या मनुष्यबळ भरतीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

नमुन्यांच्या तपासणीत अडसर

भेसळयुक्त, संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यास कारवाई करण्यात येते. यात संकलित केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यास अहवाल येण्यास अडचणी येतात. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या कारवायांचे अहवाल येण्यासही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे एफडीएच्या अन्न निरीक्षकांनी सांगितले. औषध उत्पादक कंपन्या, विक्रेते, रक्तपेढ्या, दूध भेसळ, विषारी द्रव्यसाठा, तसेच अन्नसुरक्षा व मानद कायद्याच्या अंमलबजावणीचे काम पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी आव्हान ठरते, असे ते म्हणाले.

संवर्गाचे नाव - वरिष्ठ तांत्रिक सहायक

कार्यालयाचे नाव    एकूण रिक्त पदे     मंजूर पदे    कार्यरत पदे
            

  • नागपूर    ११    १२    ०१
  • मुंबई    १६    २१    ०५
  • औरंगाबाद    ०७    १२    ०५
  • एकूण    ३४    ४५    ११


संवर्गाचे नाव -  विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ

कार्यालयाचे नाव    एकूण रिक्त पदे     मंजूर पदे    कार्यरत पदे

  • नागपूर    ०७    १२    ०५
  • मुंबई    १२    २०    ०८
  • औंरगाबाद    ०४    ०८    ०४
  • एकूण    २३    ४०    १७

Web Title: Lack of manpower in FDA laboratories; 57 posts vacant across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.