Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 07:11 IST2025-06-16T07:10:22+5:302025-06-16T07:11:43+5:30

पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला.

Kundmala's 35-year-old bridge collapsed, many tourists were swept away in Indrayani, 52 people were rescued | Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 

Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 

पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. चार जणांचे मृतदेह सापडले असून ५२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ५१ जण जखमी असून, सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. युद्धपातळीवर सुरू झालेले मदत व शोधकार्य अंधार झाल्यावर थांबवण्यात आले. 

रविवारी सुटीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १००-१५० पर्यटक लोखंडी पुलावर उभे राहून  नदीतून वाहणारे पाणी बघत होते. त्यांच्या वजनाने अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. पुलावरील अनेकजण पाण्यात पडले आणि वाहून जाऊ लागले. आरडाओरडा सुरू झाला. काही तरुणांनी वाहून जाणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच तळेगाव पोलिस, अग्निशामक दलाची पथके, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व विविध बचाव पथकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. घटनास्थळाजवळ गर्दी झाली होती. सर्वत्र भीतीचे वातावरण होते.

कुंडमळा हे तळेगाव दाभाडे शहरापासून जवळ असलेले पावसाळी पर्यटनस्थळ आहे. कुंडमळा हे पुण्यापासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. मुंबईकडे जाताना, एक्सप्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये हे ठिकाण लागते. येथे कुंडमळा धबधबा लोकप्रिय आहे. इंद्रायणी नदीतील कातळामध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेले खोलगट पाण्याचे कुंड, रांजणखळग्यांमुळे या परिसरास कुंडमळा म्हटले जाते. नदीवर जुना अत्यंत अरुंद लोखंडी साकव आहे. त्याच्या दोन्ही बाजू सिमेंटच्या पुलाने जोडल्या आहेत. या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.पूल कोसळला तेव्हा पुलाखालीही काहीजण बसले होते. पूल कोसळल्याने त्याखाली काहीजण दबले गेले असण्याची शक्यता आहे. सायंकाळी क्रेन आणून सांगाडा काढण्याचे काम सुरू होते.

सायंकाळी एनडीआरएफचे पथक आल्यानंतर बचावकार्यास गती आली. अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी १५ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. चौकशी समिती स्थापन, कठोर कारवाई करणार या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

दहा दिवसांपूर्वीच निघाले मनाई आदेश
अपघात झालेला कुंडमळा पूल जीर्ण अवस्थेमुळे दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आला होता. ३५ वर्षे जुना पूल असल्याने पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. त्याच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर झाल्याचे समजते.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, दहा दिवसांपूर्वीच पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले होते. 
५ लाख रुपयांची मदत : ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस शोकाकूळ
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी व्यक्त केले दु:ख 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून माहिती घेतली आणि दुःख व्यक्त केले. 
 

Web Title: Kundmala's 35-year-old bridge collapsed, many tourists were swept away in Indrayani, 52 people were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.