जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:02 IST2025-03-25T17:01:44+5:302025-03-25T17:02:28+5:30
कुणाल कामरा वाद गाजला असताना मविआ काळात घडलेल्या घटनांचीही चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा
मुंबई - महाराष्ट्रात सध्या कुणाल कामरा याच्या वादग्रस्त गाण्यावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. या व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. सत्ताधारी पक्षाने कुणाल कामराच्या या गाण्यावर आक्षेप घेत त्याच्यावर कारवाईचे संकेत दिलेत तर दुसरीरडे कुणाल कामराने लोकभावना मांडली, आम्ही कुणाल कामराच्या बाजूने आहोत असं विधान विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना धडे देत आहेत. कुणाल कामराचे गाणे सत्यच आहे. त्याने काही चुकीचे केले नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कुणाल कामरा वाद गाजला असताना मविआ काळात घडलेल्या घटनांचीही चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात टीका टीप्पणी करण्यात आली होती. कंगना राणौतच्या टीकेवरून उद्धव ठाकरे संतप्त झाले होते. कंगनाने तिच्या शैलीत ठाकरे सरकारला टार्गेट केले होते. सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर तिने प्रश्न उभे केले होते. अभिनेत्री कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर संजय राऊत कंगनावर भडकले होते. त्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरे यांच्यावर नेपोटिज्मचा आरोप केला होता.
कंगना राणौत आणि ठाकरे यांच्यातील वादात त्यावेळी मुंबई महापालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयातील अनाधिकृत बांधकामावर हातोडा मारला होता. त्याशिवाय तिच्या बंगल्याच्या एका भागावर तोडक कारवाई करण्यात आली होती. कंगनाने ठाकरेंशी घेतलेल्या पंग्यानंतर ही कारवाई झाली होती. त्यानंतर सामना या मुखपत्रातून उखाड दिया असं शीर्षक प्रकाशित करून कंगनाला डिवचण्यात आले होते. तेव्हा कंगनाने आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टुटेगा असा इशारा दिला होता.
निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण
अभिनेता कंगना राणौत प्रकरणानंतर ६२ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे मारहाण झाली होती. या चित्रात उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांना दाखवण्यात आले होते. १० सप्टेंबर २०२० साली या प्रकरणावरून संतप्त शिवसैनिकांनी माजी अधिकारी मदन शर्मा यांना त्यांच्या राहत्या घरातून बाहेर काढत मारहाण केली होती. या मारहाणीत ६२ वर्षीय शर्मा यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
मराठी अभिनेत्रीचा ४० दिवस जेलमध्ये मुक्काम
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने मे २०२२ साली फेसबुकवर एक कविता पोस्ट केली होती. त्यात शरद पवारांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी होती. त्यात पवारांचे वय आणि राजकीय प्रभाव त्यावर व्यंगात्मक टीका केली होती. ही कविता केतकीने शेअर केली होती. या प्रकरणी मोठा वाद झाला. त्यानंतर केतकी चितळे हिला अटक करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. हे प्रकरण इतके चिघळले होते की त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच केतकीवर काळी शाई, अंडे फेकून निषेध केला होता. जवळपास ४० दिवस केतकी जेलमध्ये होती. आता कुणाल कामरा याने शेअर केलेल्या गाण्यावरून असाच वाद निर्माण झाला आहे.