पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नागरी सहकारी बँका कोल्हापूर जिल्ह्यात, ठेवींत किती कोटींची वाढ.. जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Updated: September 13, 2025 19:08 IST2025-09-13T19:08:34+5:302025-09-13T19:08:59+5:30
स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुश

संग्रहित छाया
राजाराम लोंढे
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ४५ नागरी सहकारी बँकाकोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या सगळ्याच बँका आर्थिकदृष्ट्या ताकदवान असून, तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. यावरून बँकांची आर्थिक सक्षमता निश्चित होते. या बँकांच्या ठेवीत आर्थिक वर्षात तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली असून, कर्जाच्या तुलनेत तिप्पटीने ठेवीमध्ये वाढ झाली आहे.
बँका, पतसंस्था, साखर कारखाने, विकास संस्था, दूध संस्थांचे जाळे काेल्हापूर जिल्ह्यात विणले आहे. राज्याच्या तुलनेत कोल्हापुरात खऱ्या अर्थाने सहकार रुजला आणि वाढल्याने सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते. इतर जिल्ह्यांत यापेक्षाही अधिक सहकारी संस्था असतील, पण इतक्या सक्षम संस्था महाराष्ट्रात एकाही जिल्ह्यात बघावयास मिळत नाहीत. त्याला येथील शेतकरी कारणीभूत मानला जातो. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्वाधिक संस्था कोल्हापुरात आहेतच, त्याचबरोबर वित्तीय संस्थांची संख्याही तुलनेत अधिक आहे. येथे ४१ नागरी सहकारी बँका, १३७२ नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्था, ३५० पगार नोकरांच्या पतसंस्था तर एक जिल्हा मध्यवर्ती अशा १७६८ वित्तीय संस्था कार्यरत आहेत.
केवळ संस्थांची संख्या अधिक नाहीतर येथील वित्तीय संस्थांमध्ये वर्षाला होणारी प्रगती नेत्रदीपक आहे. मागील २०२३-२४ आर्थिक वर्षापेक्षा २०२४-२५ मध्ये नागरी बँकांच्या ठेवीमध्ये तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली आहे. कर्जाचे वाटप ३५९ कोटींने अधिक झाले असले तरीही वसुलीचे प्रमाण खूप चांगले आहे. तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे.
स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुश
येथे नागरी बँकांची संख्या अधिक असल्याने व्यवसायात कमालीची स्पर्धा पाहावयास मिळते. कामकाज चुकीचे केले तर ग्राहक बाजूला जाईल, याची भीती बँक व्यवस्थापनाला असते. त्याचबरोबर या बँकांवरच स्थानिक राजकारण अवलंबून असल्याने नैतिक भीतीही प्रत्येकाच्या मनात असते.
पश्चिम महाराष्ट्रात वित्तीय संस्था
जिल्हा - जिल्हा बँक - नागरी बँका - नागरी/ग्रामीण पतसंस्था - पगारदारांच्या पतसंस्था - एकूण संस्था
कोल्हापूर - ०१ - ४५ - १३७२ - ३५० - १७६४
सांगली- ०१ - २० - १०२६ - १८० - १२२७
सातारा - ०१ - २२ - ६४७ - २११ - ८८१
कोल्हापुरातील बँकांचे विश्वस्त मंडळाबरोबरच सभासद, ग्राहकांचे कौतुक केले पाहिजे. येथे सुरुवातीपासून प्रत्येकाने आर्थिक शिस्त लावून घेतली आहे. त्यानुसारच कामकाज सुरू असल्याने नागरी सहकारी बँका अधिक ताकदीने काम करत आहेत.- अनिल नागराळे, बँकिंगतज्ज्ञ