मनीषा म्हात्रे, मुंबईचोरीतील पैशांच्या वाटणीवरून तरुणाने तब्बल १८ वार करून मित्राची निर्घृण हत्या केली. तसेच हा गुन्हा दडविण्यासाठी स्वत:च फिर्यादी बनला. मात्र देवनार पोलिसांनी त्याचे बिंग फोडले आणि त्याला अटक केली. हसीन अन्सारी (१९) असे आरोपीचे नाव आहे. तर अकबर लहरी असे यामध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. १ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्र नगर येथे १९ वर्षांच्या तरुणाच्या हत्येची माहिती देवनार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लहरी आणि अन्सारीला रुग्णालयात दाखल केले. अन्सारीला फिर्यादी करून घेतले. दरम्यान, अन्सारीने दिलेल्या माहितीत तफावत जाणवल्याने वरीष्ठ पोलीस निरिक्षक मुनीरखान इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे गुलाबराव पाटील, सपोनी विजय अंबेरके आणि त्यांच्या तपास पथकाने अन्सारीच्या दिशेने उलट तपास सुरु केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतेवेळी अन्सारीने लिफ्ट कोसळून अपघातात जखमी झाल्याची खोटी माहीती दिल्याचे समोर आले. त्याने सांगितलेल्या सुरक्षा रक्षकाच्या माहितीत घटनेच्या दिवशी मृतदेहाशेजारी असलेल्या अन्सारीला त्याने थांबण्यास सांगितले होते. मात्र असे असतानाही अन्सारीने घटनास्थळाहून पळ काढला. अन्सारीच्या माहितीवरून बनविण्यात आलेल्या आरोपीच्या छायाचित्रातील तरुणाचा सुगावाही पोलिसांनी लावला.त्याला अन्सारी समोर उभे करताच त्याची बोबडी वळली. आणि आपण यात फसलो याची जाणीव होताच अन्सारीने आपल्याची गुन्हा कबुली दिली. नेमके काय झाले?व्यसनासाठी लूटमार करून ते पैसे उकळत होते. २६ मे रोजी दोघांनी एका बिहारी तरुणाला लुटले. त्यातून चार हजार रुपये मिळाले. ठरल्याप्रमाणे ते पैसे दोघांमध्ये वाटून घेण्यासाठी १ जूनच्या रात्री ते एकत्र जमले होते. दोघेही दारू आणि गांजाची नशा करून महाराष्ट्र नगरच्या मैदानात आले. अशात लहरीने केवळ ५०० रुपये देऊन अन्सारीला भागवून घ्यायला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. जाताना रागाच्या भरात चाकूने त्याने अन्सारीवर हल्ला चढविला. अन्सारीने नशेच्या आवेगात त्याच्या हातातील चाकू घेऊन लहरीवर वार करून हत्या केली.
मारेकरीच बनला फिर्यादी
By admin | Updated: June 7, 2015 01:45 IST