Khadse does not have chance to speech in the CM's rally | मुख्यमंत्र्यांच्या सभेत खडसेंना भाषणाचीही संधी नाही !
मुख्यमंत्र्यांच्या सभेत खडसेंना भाषणाचीही संधी नाही !

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा सुरू आहे. ही यात्रा शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात दाखल झाली. मात्र या महाजनादेश यात्रेतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलल्याचे दिसून आले. जळगाव येथील सागर पार्क येथे आयोजित सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल अडीच तास उशिरा आले. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत अर्धा तास ताटकळत बसावे लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची वेळ १:३० वाजता ठरविण्यात आली होती. परंतु, मुख्यमंत्री ४ वाजता सभास्थळी दाखल झाले. तर एकनाथ खडसे ३:३० वाजेपासूनच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर ते अर्धा तास ताटकळत बसले. काही वेळाने आमदार हरिभाऊ जावळे हेही व्यासपीठावर पोहोचले. मुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाल्यानंतर खडसे आणि मुख्यमंत्री यांच्या खुर्चीमध्ये बरेच अंतर ठेवण्यात आले होते. याबाबत सभास्थळी चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी आमदार सुरेश भोळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भाषणे झाली. परंतु, खडसे व्यासपीठावर उपस्थित असूनही त्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. आधीच मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात सभा घेण्याचे टाळले आहे. खडसेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा होणार नसल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा होती. त्यातच आता जिल्ह्यातील कार्यक्रमात भाषणाची संधी न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

 


Web Title: Khadse does not have chance to speech in the CM's rally
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.