"काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर..."; नाना पटोलेंचा महत्त्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:18 IST2025-02-18T19:17:18+5:302025-02-18T19:18:48+5:30
Nana Patole Congress, Maharashtra Politics: नाना पटोलेंच्या जागी आज हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद

"काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर..."; नाना पटोलेंचा महत्त्वाचा सल्ला
Nana Patole Congress, Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेसला अपयश आले. महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढूनही काँग्रेसला मोठा पल्ला गाठता आला नाही. त्यानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. त्यांचा आज पदग्रहण सोहळाही पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नाना पटोले यांनी काँग्रेसला राज्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
काय म्हणाले नाना पटोले?
"मी चार वर्षात संघटनेला बळ देण्याचे काम केले. पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. विधानसभेत काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते पण भाजपाने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही, पण मतदान वाढले कसे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली. आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे. काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर अफवांना बळी पडू नका, लोकांची कामे करत राहा. तरच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल," असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है! विरोधी पक्ष सक्षम नाही म्हणूनच भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे. कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देऊया आणि काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवूया. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवूया," असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.