पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:31 IST2025-11-17T08:29:00+5:302025-11-17T08:31:22+5:30
महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते.

पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
डहाणू- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांड प्रचंड गाजले. या घटनेवरून भाजपाने राज्यभरात रान उठवले होते. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याची सुरुवात याच घटनेपासून सुरू झाली होती. या घटनेत भाजपाने ज्यांच्यावर गंभीर आरोप केलेत, त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ चौधरी यांना मोठ्या दिमाखात भाजपाने प्रवेश दिला आहे. डहाणूत भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र आलेले असताना भाजपाने काशिनाथ चौधरींचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. मात्र या पक्षप्रवेशावरून भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
डहाणूत शिंदेसेना, अजित पवार गट, उद्धवसेना, शरद पवार गट एकीकडे भाजपाविरोधात एकत्र आलेले आहेत. त्यातच दुसरीकडे शरद पवार गटाचे काशिनाश चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत डहाणू तालुक्यातील कासा, सायवन, कळमादेवी, मोडगाव, खुबाले, रायपूर, उधवा, हळदपाडा यासह शेजारील तलासरीचे तालुकाध्यक्ष संजू वराठा यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे खासदार डॉ. हेमंत सावरा, आ.हरिशचंद्र भोये, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह इतर नेते होते.
काय आहे पालघर साधू हत्याकांड?
महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते. लॉकडाऊन काळात पालघर जिल्ह्यात साधू चिनमयानंद आणि सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ही घटना घडल्याने भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरले होते. या घटनेतील मुख्य सूत्रधार काशिनाथ चौधरी आहेत असा आरोप भाजपाने केला होता. मात्र याच काशिनाथ चौधरींना भाजपाने पक्षप्रवेश दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
१६ एप्रिल २०२० रोजी घडलेल्या या घटनेत भाजपा नेत्यांनी चौधरी यांना प्रमुख दोषी ठरवले होते. एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारविरोधात जे बंड केले त्याचे हे प्रमुख कारण सांगण्यात आले. जमावाच्या हल्ल्यात २ साधू आणि एका वाहन चालकाची हत्या झाली होती. त्यात पोलिसांनी २०० लोकांना ताब्यात घेतले, १०८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. काशिनाथ चौधरी त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते, तेव्हा भाजपाने या घटनेमागील मुख्य सूत्रधार तेच असल्याचा आरोप केला होता. मात्र आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर चौधरी यांना भाजपाने पक्षात घेत कमळ हाती दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपावर तोंडसुख घेतले आहे.