आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, कंगना रनौतवर गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची १२ तासांच्या आत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 04:49 IST2020-10-18T04:48:06+5:302020-10-18T04:49:52+5:30
कंगना व रंगोलीवर आयपीसी कलम १५३ (ए), २९५ (ए) १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सय्यद यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके)करून लोकांना भडकावले. (Kangana Ranaut)

आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी, कंगना रनौतवर गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची १२ तासांच्या आत कारवाई
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश वांद्रे न्यायालयाने दिल्यानंतर १२ तासांच्या आत पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला. कंगना व तिची बहीण रंगोली यांनी टिष्ट्वटरवर पोस्ट टाकून हिंदू व मुस्लीम समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर मुन्नावरली सय्यद यांनी केला. बाबत वांद्रे दंडाधिकारी न्यायलयात त्यांनी तक्रार केली होती.
या तक्रारीत दोघींनी टिष्ट्वटर आणि मुलाखतीमध्ये केलेल्या विधानावरून आरोप करण्यात आले. तज्ज्ञांकडून याबाबत तपास करणे आवश्यक आहे, असे दंडाधिकारी जयदेव खुले यांनी आदेशात म्हटले होते.
पोस्टमागे हेतू तपासणे आवश्यक -
कंगना व रंगोलीवर आयपीसी कलम १५३ (ए), २९५ (ए) १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सय्यद यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके)करून लोकांना भडकावले. अशी पोस्ट करण्यामागे कंगनाचा मूळ हेतू काय आहे, याचा तपास करणे आवश्यक आहे, असे सय्यद यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
ट्विटरवरून केले होते पोलिसांना लक्ष्य -
सुशांतने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने टिष्ट्वट करून बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका केली होती. तसेच याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस नीट करत नसल्याचा आरोप करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तसेच त्यावरून शिवसेनेलाही लक्ष्य केले होते.
बंगल्यासंदर्भातील केलेल्या याचिकेवर निकाल राखून
दरम्यान, कंगनाने तिच्या पाली हिल येथील बंगल्यावर पालिकेने कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉलीवूडच्या पाठीशी - गृहमंत्री
बॉलीवूडमधल्या काही जणांचा ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. पण त्यांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकविणे योग्य नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवूडची बदनामी करता येणार नाही. महाराष्ट्र पोलीस सदैव बॉलीवूडच्या पाठीशी आहे. मात्र, ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकल्यास कारवाई होणारच, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.